Pimpri: आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांची गैरसोय होणार नाही – आयुक्त हर्डीकर

महापालिका अधिकारी आणि पोलिसांची संयुक्त बैठक

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा फैलाव वाढू नये यासाठी सुरक्षात्मक उपाय म्हणून सरकारने जमावबंदी, संचारबंदी लागू केली आहे. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रत्येक यंत्रणेने जबाबदारीने काम करावे. आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जात असताना नागरिकांची गैरसोय होणार नाही याकडे लक्ष द्यावे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा खंडीत होणार नाही. याची दक्षता घेवून त्याचे व्यवस्थापन करण्याचे काम पोलीस यंत्रणा आणि महापालिकेने करावे, अशा सूचना महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अधिका-यांना दिल्या.

महापालिकेद्वारे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शासनाकडून देखील याबाबत विविध सुचना आणि आदेश वेळोवेळी प्राप्त होत आहेत. या सुचनांची आणि आदेशांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी आज (मंगळवारी) पोलीस अधिकारी आणि महापालिका अधिका-यांची समन्वय बैठक महापालिकेत पार पडली.

आयुक्त हर्डीकर म्हणाले, कोणत्याही ठिकाणी गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी. जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करताना व्यक्तीमध्ये सुरक्षित अंतर राखले पाहिजे. आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने विविध निर्णय घेतले आहेत. लोकांनी घरामध्ये रहावे, अकारण गर्दी करु नये आदी सूचना शासन तसेच महापालिकेने नागरिकांना सातत्याने दिल्या आहेत.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपलब्ध यंत्रणेचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी या आपत्कालीन परिस्थितीत सुक्ष्म नियोजन आणि व्यवस्थापनाची गरज आहे. महापालिका आणि पोलीस यंत्रणेने आपसात समन्वय ठेवून सक्षमपणे गतिमान कामकाज करावे. पोलीस अधिकारी कर्मचारी आणि महापालिका अधिकारी कर्मचारी यांनी स्वत:च्या आरोग्याची काळाजी घ्यावी, असेही आयुक्त हर्डीकर म्हणाले.

बैठकीला पोलीस उपआयुक्त सुनिल हिरेमठ, महापालिकेचे शहर अभियंता राजन पाटील, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, बाळासाहेब खांडेकर, मनोज लोणकर, अण्णा बोदडे, प्रशांत जोशी, संदिप खोत, सीताराम बहुरे, स्मिता झगडे, हिंमतराव खराडे, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल, पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे पोलीस उपनिरीक्षक आणि महापालिका अतिक्रमण पथकातील कर्मचारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.