Pimpri : उमेदवार वाढले; पिंपरीतील प्रत्येक केंद्रावर लागणार दोन मतदान यंत्रे

एमपीसी न्यूज – पिंपरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक रिंगणात पंधरापेक्षा जास्त उमेदवार राहिले आहेत. पिंपरीत 18 उमेदवार आहेत. एका यंत्रावर 15 उमेदवार आणि ‘नोटा’चा पर्याय देणे शक्य आहे. त्यामुळे जास्त उमेदवार असल्याने आता या मतदारसंघातील प्रत्येक केंद्रावर दोन मतदान यंत्र (बॅलेट युनिट) वापरावी लागणार आहेत.

विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी ‘ईव्हीएम’ आणि ‘व्हीव्हीपॅट’ यंत्राचा वापर केला जाणार आहे. यामध्ये ‘ईव्हीएम’वर (बॅलेट युनिटवर) उमेदवाराचा अनुक्रमांक, त्याचे नाव, पक्षाचे नाव, चिन्ह देण्यात येते. उमेदवाराचा फोटो देखील बॅलेट युनिटवर असणार आहे. हे बॅलेट युनिट कंट्रोल युनिटला जोडण्यात येते. एका बॅलेट युनिटवर सोळा उमेदवारांची नावे बसतात. निवडणुकीला उभे असणा-या सर्व उमेदवारांची नावे टाकल्यानंतर सर्वात शेवटी बॅलेट युनिटवर ‘नोटा’चा पर्याय देण्यात येतो.

त्यामुळे एका बॅलेट युनिटवर पंधरा उमेदवारांची नावे व ‘नोटा’ हा पर्याय देणे शक्य असते. प्रत्यक्षात मात्र पिंपरी विधानसभा मतदारसंघातून 18 उमेदवार रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांच्या नावानंतर बॅलेट युनिटवर ‘नोटा’ हा पर्याय देण्यात येणार आहे. त्यामुळे पिंपरी मतदारसंघात प्रत्येक मतदान केंद्रावर दोन बॅलेट युनिट वापरले जाणार आहेत. यामध्ये एका बॅलेट युनिटवर सोळा उमेदवारांची नावे असणार असून दुस-या बॅलेट युनिटवर उर्वरित उमेदवारांची नावे आणि ‘नोटा’ हा पर्याय देण्यात येणार आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली इंदाणी-उंटवाल म्हणाल्या, “पिंपरी विधानसभा मतदारसंघात 18 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. प्रत्येक मतदान केंद्रासाठी असणाऱ्या इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रात (ईव्हीएम) 2 बॅलेट युनिट, 1 कंट्रोल युनिटचा समावेश असेल. त्याशिवाय प्रत्येक मतदान केंद्रनिहाय 1 ‘व्हीव्हीपॅट’ मशीन आवश्यक आहे”

पहिल्या बॅलेट युनिटवर 1 ते 16 उमेदवारांची नावे असतील. दुसऱ्या बॅलेट युनिटवर सतराव्या आणि अठराव्या उमेदवाराचे नाव आणि 19 क्रमांकाला नोटाचे (नकाराधिकार) बटण असणार आहे. एकूण 399 मतदान केंद्रांसाठी 798 बॅलेट युनिटची आवश्यकता आहे. तर, 80 बॅलेट युनिट राखीव ठेवण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.