Pimpri: महापौर पदासाठी ‘या’ 21 महिलांची दावेदारी, कोणाला मिळणार संधी?

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौरपद पुढील अडीच वर्षाकरीता सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहे. सत्ताधारी भाजपकडून खुल्या संवर्गातून निवडून आलेल्या 21 महिलांची महापौर पदासाठी दावेदारी असणार आहे. त्यामुळे महापौरपदी कोणाला संधी मिळणार याकडे शहराचे लक्ष लागले आहे. दरम्यान, इतर मागास प्रवर्ग, अनुसूचित जमाती या संवर्गातील नगरसेविका देखील महापौरपदावर दावा करु शकतात. तथापि, आजपर्यंतचा इतिहास पाहता गावकी-भावकीच्या राजकारणामुळे मराठा समाजालाच महापौरपद मिळण्याची दाट शक्यता आहे.

महापौर राहुल जाधव यांची वाढीव मुदत 21 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्याकरिता पुढील अडीच वर्षासाठीची महापौरपदाची आरक्षण सोडत आज काढण्यात आली. त्यामध्ये पिंपरीचे महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहे. आजपर्यंत सहा महिलांनी शहराचे महापौरपद यशस्वीपणे सांभाळले आहे. पहिल्या महिला महापौर होण्याची संधी अनिता फरांदे यांना मिळाली होती.

महिला खुला प्रवर्गातून मंगला कदम आणि मोहिनी लांडे यांनी अडीचवर्ष महापौरपदाची धुरा सांभाळली आहे. राजकारणात मुरब्बी असलेल्या कदम, लांडे यांनी यशस्वीपणे अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. आपल्या कामाचा ठसा उमठविला होता. आता भाजपच्या नवख्या नगरसेविकांना महापौरपदाची प्रतिमा उंचाविण्याची जबाबदारी असणार आहे.

भाजपकडून तब्बल 39 महिला निवडून आल्या आहेत. त्यामध्ये खुला प्रवर्गातून सारीका सस्ते, निर्मला गायकवाड, प्रियांका बारसे, सोनाली गव्हाणे, भीमाबाई फुगे, शैलजा मोरे, शर्मिला बाबर, संगीता भोंडवे, माधुरी कुलकर्णी, करुणा चिंचवडे, कोमल मेवानी, सुजाता पालांडे, माया बारणे, आरती चोंधे, सुनीता तापकीर, निर्मला कुटे, चंदा लोखंडे, सीमा चौघुले, माई ढोरे तर भाजप सलग्न असलेल्या साधना मळेकर आणि निता पाडाळे अशा 21 नगरसेविका आहेत.

आता यापैंकी कोणत्या एका नगरसेविकेच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर इतर मागास प्रवर्ग, अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलेला महापौरपदी संधी दिली जाते का? पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

..असे आहे पक्षीय बलाबल!
पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची निविर्विदा सत्ता आहे. त्यामुळे भाजपचा महापौर होणार हे निश्चित आहे. भाजपचे तब्बल 77 नगरसेवक आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे 36, शिवसेना 9, मनसे 1 आणि अपक्ष 5 असे 128 नगरसेवक आहेत. अपक्ष नगरसेवक भाजपशी सलंग्न आहेत.

सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले, ”राज्यातील भाजपची सत्ता असलेल्या महापालिकेच्या महापौरांची नावे ठरविण्यात येणार आहेत. प्रदेश स्तरावरुन नवीन महापौराचे नाव निश्चित केली जातील. दोन दिवसात बैठक होईल. त्यानंतर प्रदेशस्तरावरुन नाव येईल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.