PMPML : दिवाळीच्या आठवड्यात पीएमपीएमएलला नऊ कोटींचे उत्पन्न

एमपीसी न्यूज – दिवाळीच्या आठवड्यात पीएमपीएमएल मालामाल ( PMPML )झाली आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत तीन कोटींचे अधिक उत्पन्न मिळाल्याने आनंदी आनंद आहे. दिवाळीनिमित्त गावी, पाहुण्यांकडे येजा करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्याने पीएमपीएमएलच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. यावर्षी दिवाळीच्या 9 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर या आठवड्याच्या कालावधीत पीएमपीएमएलला नऊ कोटी दोन लाख 40 हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे.

पिंपरी-चिंचवड, पुणे ही दोन्ही शहरे आजूबाजूच्या सातारा, सांगली, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, अहमदनगर या भागातील तरुणांसाठी रोजगार नगरी आहे. या जिल्ह्यांसह राज्य आणि देशाच्या विविध भागातून रोजगार, व्यवसाय, शिक्षण, नोकरी निमित्त येणाऱ्यांची संख्याही काही लाखांमध्ये आहे. दिवाळी सणानिमित्त हे सर्वजण आपापल्या गावी जातात. त्यामुळे दिवाळीच्या कालावधीत प्रवाशांची मोठी गर्दी होते.

Chakan : शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणावर चाकूने वार; एकाला अटक

पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरांना पीएमपीएमएल, लोकल ट्रेन, खासगी वातुकीने जोडले आहे. त्यात आता मेट्रोची देखील भर पडली आहे. मात्र प्रवाशांनी पीएमपीएमएलला पसंती दिल्याचे दिसत आहे. सन 2021 मध्ये दिवाळीच्या आठवड्यात पीएमपीएमएलला पाच कोटी 34 लाख रुपये उत्पन्न मिळाले. तर सन 2022 मध्ये सहा कोटी 35 लाख उत्पन्न मिळाले. यावर्षी हा आकडा तब्बल तीन कोटी रुपयांनी वाढून नऊ कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे.

दिवाळीच्या आठवड्यात केवळ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्वात कमी प्रवाशांनी पीएमपीएमएलने प्रवास केला. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी (12 नोव्हेंबर) पीएमपीला 91 लाख 40 हजार रुपये एवढेच उत्पन्न मिळाले. इतर सहा दिवशी हा आकडा एक ( PMPML ) कोटींहून अधिक होता.

दिवाळीच्या आठवड्यातील पीएमपीएमएलचे उत्पन्न (रुपयांमध्ये)

9 नोव्हेंबर – एक कोटी 56 लाख
10 नोव्हेंबर – एक कोटी 31 लाख
11 नोव्हेंबर – एक कोटी 26 लाख
12 नोव्हेंबर – 91 लाख 40 हजार
13 नोव्हेंबर – एक कोटी 31 लाख
14 नोव्हेंबर – एक कोटी 28 लाख
15 नोव्हेंबर – एक कोटी 39 लाख

 

https://www.youtube.com/shorts/FBE9b6zJMA0

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.