Chinchwad News : ठरलं! पिंपरी चिंचवड पोलीस शिपाई पदाची लेखी परीक्षा 23 ऑक्टोबरला होणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलीस शिपाई पदाच्या 720 जागा भरल्या जाणार आहेत. दोन वेळा लेखी परीक्षेचा मुहूर्त चुकला असून आता तिसरा मुहूर्त ठरला आहे. त्यानुसार 23 ऑक्टोबर रोजी पिंपरी चिंचवड शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर दुपारी तीन ते चार या वेळेत पोलीस शिपाई पदासाठी लेखी परीक्षा होणार आहे.

15 ऑगस्ट 2018 रोजी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय नव्याने सुरू झाले. त्यावेळी आयुक्तालयासाठी तीन टप्प्यात पूर्ण मनुष्यबळ देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर सन 2019 मध्ये पहिल्या टप्प्यातील पोलीस भरतीला सुरुवात झाली. मध्यंतरी कोरोना साथ आल्याने ही भरती प्रक्रिया रखडली. आता सर्व बाबी पूर्वपदावर येत असल्याने पोलीस भरतीची प्रक्रिया देखील राबवली जात आहे.

राज्यातील सर्व शहरांमध्ये पोलीस भरतीत प्रथम लेखी परीक्षा घेतली जात आहे. सर्व शहरात या परीक्षांच्या वेगवेगळ्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे मनुष्यबळ कमी असल्याने सर्व बंदोबस्त होईपर्यंत लेखी परीक्षेची तारीख जाहीर केली जात नव्हती. दरम्यान, प्रथम 3 ऑक्टोबर ही तारीख देण्यात आली. त्यानंतर त्यात बदल करून 17 ऑक्टोबर ही तारीख देण्यात आली. आता त्यातही बदल करून 23 ऑक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात पहिल्या टप्प्यात उपलब्ध असलेल्या 720 जागांसाठी तब्बल एक लाख 89 हजार 732 अर्ज आले आहेत.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, ‘पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे आलेल्या अर्जांची संख्या मोठी आहे. त्यामुळे लेखी परीक्षा सुनियोजित तसेच पारदर्शी पद्धतीने घेण्यात येणार आहे. त्यासाठी तयारी झाली आहे. काही अपरिहार्य कारणांमुळे दोन वेळा परीक्षेची तारीख बदलावी लागली. आता 23 ऑक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.’

पिंपरी चिंचवड पोलीस शिपाई पदाच्या कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा –

  • सर्वसाधारण – 176
  • महिला – 216
  • खेळाडू – 38
  • प्रकल्पग्रस्त – 38
  • भूकंपग्रस्त – 14
  • माजी सैनिक – 107
  • अंशकालीन पदवीधर – 71
  • पोलीस पाल्य – 22
  • गृहरक्षक दल – 38

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.