Pune News : आता खासगी रुग्णालयात कोरोनासाठी स्वतंत्र बेड्स असणार राखीव !

आता खासगी रुग्णालयात कोरोनासाठी स्वतंत्र बेड्स असणार राखीव !

एमपीसी न्यूज : पुणे शहर आणि उपनगरात कोरोना बाधितांची संख्या दररोज 100 ने वाढत आहे. त्या पार्श्वभुमीवर कोरोना बाधित रुग्णांना उपचारांसाठी खाटांची (बेड्स) सुविधा करण्यास महापालिकेकडून सुरूवात झाली आहे. महापालिकेसह खासगी हॉस्पिटल्सचे काही बेड्स ताब्यात घेतले जात आहेत. आयुक्त विक्रम कुमार यांनी खासगी रुग्णालयांना कोविडचे बेड तातडीने वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच आवश्‍यकतेनुसार टप्प्याटप्प्याने हे बेड वाढवण्याबाबतही सर्तक राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पुणे शहरात पुन्हा करोनाची साथ वाढल्यास हे बेड 24 तासांच्या आत महापालिकेसाठी पुन्हा उपलब्ध करून देण्याचे हमीपत्रही या खासगी हॉस्पिटलकडून घेतलेले होते. मात्र, मागील दहा दिवसांपासून शहरात पुन्हा नव्याने बाधित होणाऱ्या रूग्णांचा आकडा लक्षणीय प्रमाणात वाढण्यास सुरूवात झाली आहे.

दररोज होणाऱ्या तपासण्यांच्या तुलनेत रुग्ण निष्पन्न होण्याचे प्रमाण (पॉझिटीव्हीटी रेट) 12 टक्‍क्‍यांच्या पुढे गेला आहे. यामुळे चिंता वाढली आहे. सक्रीय बाधितांचा आकडा 2 हजारांपर्यंत गेला असून हा आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे रुग्णवाढ झपाट्याने झाल्यास बेडची संख्या कमी पडू नये, या उद्देशाने महापालिकेकडून आतापासूनच खबरदारीचा उपाय म्हणून पुन्हा खासगी हॉस्पिटलला बेड सज्ज ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

सुमारे 600 ऑक्‍सिजन बेड महापालिकेकडे तयार आहेत. शहरात करोनाच्या नवीन बाधितांचा आकडा वाढत असतानाच, महापालिकेकडे सुमारे 600 ऑक्‍सिजन बेड तयार आहेत. यात, बाणेर कोविड केअर सेंटर 350, डॉ. नायडू रुग्णालय 120,लायगुडे दवाखाना 50, खेडेकर दवाखाना 50 बेड तयार आहेत.

या शिवाय, गरज पडल्यास महापालिकेच्या जागेतील कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्याचे नियोजन आहे. याशिवाय सीओईपी मैदानावरील जम्बो कोविड सेंटरही पुन्हा सुरू केले जाण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. येत्या दोन महिन्यासाठी जम्बो कोविड सेंटरचे स्ट्रक्चर जसाश तसे ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.