Pune News : राज्य शासनाच्या योजनांची रेल्वेबोगींवरही प्रसिद्धी, पुणेमार्गे धावणाऱ्या तीन एक्सप्रेसचा समावेश

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र सरकार प्रथमच रेल्वेच्या माध्यमातून ‘आपला महाराष्ट्र आपले सरकार’ या मोहिमेतून रेल्वेबोगींवर शासनाच्या कल्याणकारी योजनांची प्रसिद्धी हा उपक्रम राबवित आहे. पुण्यामार्गे धावणाऱी कोल्हापूर-गोंदिया या लांबपल्ल्याची महाराष्ट्र एक्सप्रेस, लातूर एक्सप्रेस, कोयना एक्सप्रेसचा यात समावेश आहे. 7 फेब्रुवारीपासून या अभियानाला सुरुवात झाली आहे.

राज्य शासनाकडून विविध लोकहिताच्या योजना राबविल्या जातात. माहिती व जनसंपर्क महासंचालनालातर्फे विविध माध्यमांद्वारे त्या जनतेपर्यंत पोहोचवल्या जातात. आता या योजनांना रेल्वेबोगींवर देखील प्रसिद्ध केले जाणार आहे. आतापर्यंत केवळ खासगी आणि केंद्र शासनाच्या उपक्रमांद्वारे वापरल्या जाणाऱ्या रेल्वे डब्यांवर जाहिराती ‘रॅप’ करण्याची संकल्पना राज्य शासनानेही अवलंबली असून पाच एक्सप्रेस रेल्वेगाड्यांवर शासनाच्या जाहिराती प्रदर्शित करण्यात आल्या आहेत.

गेल्या दोन वर्षात राज्य शासनाने राबवलेल्या व प्रगतीपथावर असलेल्या जलद वाहतुकीसाठी सागरी मार्ग, समृध्दी महामार्ग आणि मेट्रो रेल्वे प्रकल्प, कुटूंबातील महिलांच्या नावावर घर असल्यास मुद्रांक शुल्कात एक टक्क्याची सूट, क्षमता आणि कौशल्य वृध्दीसाठी शिक्षण-प्रशिक्षण आदींसह आरोग्य, शेती, क्रीडा आदी विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत या उपक्रमाद्वारे पोहोचणार आहे. दादर- सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस आणि मुंबई- नागपूर नंदीग्राम एक्सप्रेस या दोन गाड्यांवरही या जाहिरात संकल्पना प्रदर्शित करण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.