Pune : पुण्याच्या पाणी वाटपासाठी उद्या होणार मुंबईत बैठक

एमपीसी न्यूज- पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) पाणी वाटपाबाबत निर्णय घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पाणी वापर समितीची पहिली बैठक महापालिका आयुक्तांच्या परदेशवारीमुळे रद्द झाली होती. ही बैठक उद्या (बुधवार दि.26) मुंबईत होणार आहे. महापालिकेला खडकवासला धरणसाखळीतून देण्यात येणा-या पाण्यात कपात करून 8 टीएमसी पाणी पीएमआरडीएसाठी देण्याबाबत निर्णय होणार आहे. पीएमआरडीएच्या सहा प्रमुख गावांसह इतर गावांसाठी ही मागणी झाली आहे.

पुण्याच्या पाणी वापरात काटकसर करून 8 टीएमसी पाणी पीएमआरडीएला देता येईल असा अहवाल जलसंपदा विभागाने यापूर्वीच दिला आहे. महापालिकेने मात्र पुण्याच्या पाण्यात कपात करता येणार नसल्याचे स्पष्ट केले होते, त्यामुळे या बैठकीत होणाऱ्या चर्चेवर भविष्यातील शहराची पाण्याची स्थिती निश्चित केली जाणार आहे.

गेल्या काही वर्षांत शहराची वाढ वेगाने झाल्याने पाण्याचा वापर वाढला आहे. त्यामुळे पाणी वाटपावरून शहर आणि ग्रामीण असा वाद सातत्याने होत आहे. त्यातच आता ‘पीएमआरडीए’नेही त्यांच्या हद्दीसाठी 3 टीएमसी पाण्याची मागणी केली आहे. त्यावर निर्णय घेण्यासाठी राज्य शासनाने नगरविकास प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची एक समिती नेमली आहे. ही समिती पाणी वाटपाबाबत नव्याने निर्णय घेणार आहे. या समितीची पहिली बैठक 14 सप्टेंबर रोजी मुंबईत बोलविण्यात आली होती. मात्र, महापालिका आयुक्त सौरभ राव हे परदेश दौ-यावर जाणार असल्याने ती पुढे ढकलण्यात आली होती. ही बैठक आता बुधवारी होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.