Pune: मोहोळ महाविद्यालयातील सायबर क्राईम वेबिनारमध्ये देशभरातील 2543 जणांचा सहभाग

Pune: 2543 people from all over the country participated in the cyber crime webinar organised by Mohol College सोशल नेटवर्कींगद्वारे धमक्या देणे, आर्थिक गुन्हेगारी, मुलांविरूद्ध गुन्हे आणि ई-मेलद्वारे फसवणूक हे सुद्धा सायबर गुन्हेगारीच्या कक्षेत येत आहे.

एमपीसी न्यूज- पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या मामासाहेब मोहोळ महाविद्यालयाच्या वतीने आयोजित एकदिवसीय सायबर क्राईम वेबिनार मध्ये देशातील विविध राज्यांमधून 2543 जणांनी सहभाग नोंदविला. तर, 3339 जणांनी नोंदणी केली आहे.

राज्याचे सायबर सुरक्षेचे पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव, पुणे शहराच्या सायबर गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ.शिवाजी पवार, सायबर गुन्हे अन्वेषण तज्ज्ञ संदीप गादिया, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ मानद सचिव तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य अ‍ॅड. संदीप कदम, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे खजिनदार अ‍ॅड. मोहनराव देशमुख सहसचिव आत्माराम जाधव, प्राचार्य डॉ.बालकृष्ण झावरे आदी यावेळी उपस्थित होते.

वेबिनारच्या प्रास्ताविकात “इंटरनेटच्या सकारात्मक वापराबरोबरच दुष्प्रवृत्तींद्वारे केला जाणारा दुरुपयोग सर्वसामान्यांचे जीवन, राष्ट्राची सुव्यवस्था, अर्थव्यवस्था डळमळीत करू शकतो. इंटरनेटद्वारे केल्या जाणार्‍या गैरवापरास ’सायबर क्राईम’ म्हटले जाते.

या सायबर क्राईमची व्याप्ती, त्याबाबत घ्यावयाची सुरक्षितता अशा अनेक पैलूंवर या वेबिनारमधून आपल्याला निश्चितच फायदेशीर ठरेल” असे प्राचार्य व वेबिनारचे आयोजक डॉ. बाळकृष्ण झावरे यांनी सांगितले.

सायबर क्राईम विषयावर राष्ट्रीय वेबिनारच्या पहिल्या सत्रात राज्याचे सायबर सुरक्षा पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव म्हणाले, ‘आपण ‘इन्फॉरमेशन युगात’ राहतो. माहिती आजकाल अतिशय सहजपणे व सर्वांना उपलब्ध आहे. संगणक, मोबाईल फोन, डिजिटल कॅमेरे आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत.

दररोजच्या जीवनातील विविध पैलूंमधील तंत्रज्ञानाचा आणि इंटरनेटचा वाढता वापर, यामुळे सायबर अपराधी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर नागरिकांवर हल्ला करत आहेत.

हे अपराध्यांसाठी एका जागी बसून करणे सोपे आहे. यांचे एक कारण असेही आहे की, माहितीच्या देवघेवीचे हे तंत्रज्ञान वापरतांना ते करणाऱ्या व्यक्ती या बरेचदा पूर्णपणे अनोळखी असतात, यात काही सीमारेषा नसतात, म्हणजेच नायजेरियात बसून कोणी तुमच्याशी संवाद साधेल. पण भासवेल की हा संवाद अमेरिकेतून होतोय.

हे एक साधे सोपे समजावे असे उदाहरण झाले पण सांगायचा मुद्दा हाच की, यातले बरेच गुन्हे हे अनोळखीपणाचा फायदा घेऊन केले जातात. आज जगातील प्रत्येक क्षेत्र, व्यवसाय, इंटरनेटने प्रभावित झालेला दिसतो.

इंटरनेटच्या या मायाजालाचा हॅकर अतिशय क्लुप्तीने गैरवापर करतात. उदा. मध्यंतरी रशियाने जॉर्जियावर हल्ला करून हा देश आपल्या ताब्यात घेतला होता.

मात्र, या हल्ल्याआधी रशियन इंटेलिजन्सच्या हॅकर्सने जॉर्जियाच्या संगणक प्रणाली, दूरसंचार यंत्रणा, प्रमुख सर्व्हर हॅक करून दळणवळण यंत्रणा या सायबर हल्ले करून आपल्या नियंत्रणाखाली आणल्यामुळे जॉर्जियावर प्रत्यक्ष हल्ला करणे रशियाला अगदी सोपे झाले.

इराणची न्यूक्लियर वेपन सिस्टिममध्ये (क्षेपणास्त्र यंत्रणा) ‘स्टक्स नेट’ हा व्हायरस/मालवेअर डाऊनलोड करण्याचा प्रयत्न झाला. अल कायदाच्या हॅकर्सचा यात हात असल्याचा संशय आहे.

तर अमेरिकेतील एका १२ वर्षीय मुलाने ‘नासा’ या अमेरिकेन अंतराळ संशोधन संस्थेतील सॅटेलाइटची दिशा हॅकिंगद्वारे बदलली होती” असेही त्यांनी सांगितले.

देशातील आर्थिक विषमतेची दरी या सिलिकॉन व्हॅलीमुळे भरून निघत आहे. मात्र, या ताकदवान माध्यमाचा सकारात्मक वापर होणे गरजेचे आहे. याबाबत व्यक्तिसापेक्ष जागरूकता बाळगली पाहिजे.

फेसबुक या प्रचंड लोकप्रिय वेबसाईटचा निर्माता मार्क झुकेरबर्ग याचे वेब पेजसुद्धा हॅक करण्यात आले होते. सायबर क्राईममधील आजची व उद्याची आव्हाने सायबर क्राईम रोज नव्या स्वरूपात, नव्या आकारात व नव्या शस्त्रासह पुढे येत आहे.

तज्ज्ञांच्या निष्कर्षानुसार आज डेटा थेप्ट, सायबर स्टॉकिंग, हॅकिंग, व्हायरस अटॅक, पोर्नोग्राफी ही महत्त्वाची सायबर आव्हाने तर आहेतच. त्याशिवाय सॉफ्टवेअर पायरसी, फिशिंग, स्पुफिंग, स्टॉकिंग, क्रेडिट कार्ड फ्रॉड, थे्रटनिंग, ड्रग्ज ट्रॅफिकिंग, सायबर टेररिझम अशा व्यापक स्वरूपात देखील सायबर क्राईमपुढे आला आहे.

आज भारतात हॅकिंग, पोर्नोग्राफी व डेटा थेप्ट हे अशा स्वरूपाचे गुन्हे आयटी सेक्शनखाली नोंदविले जातात. तथापि यात व्यापकता येऊन सायबर क्राईमखाली येणारे सर्व गुन्हे आयटी सेक्शनखाली नोंद होणे महत्त्वपूर्ण ठरेल, असे मत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव अ‍ॅड.संदीप कदम यांनी मांडले.

पुणे सायबर क्राईम सेल आणि क्राईम ब्रांचचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, “सायबर गुन्हे विशेषकरून हॅकिंग, लैंगिक चित्रण इत्यादी स्वरूपात घडताना दिसतात.

याशिवाय खासगी किंवा गोपनीय माहिती चोरणे, फोडणे आदी प्रकारदेखील सायबर गुन्ह्यांमध्ये मोडतात. सोशल नेटवर्कींगद्वारे धमक्या देणे, आर्थिक गुन्हेगारी, मुलांविरूद्ध गुन्हे आणि ई-मेलद्वारे फसवणूक हे सुद्धा सायबर गुन्हेगारीच्या कक्षेत येत आहे.

तसेच पुणे शहरातील सायबर गुन्ह्यांच्या आकडेवारी आणि सध्याच्या सायबर गुन्ह्याचा ट्रेंड काय आहे ह्याबद्दद्ल अत्यंत महत्वाची माहिती दिली.

..तर तुमची शिकार होणारच

अध्यक्षीय भाषणात खजिनदार अ‍ॅड. मोहनराव देशमुख यांनी “इंटरनेट हे माहितीचे महाजाल आहे आणि निश्चितच ते समाजासाठी एक वरदानही आहे. पण त्याचा वापर तेवढा आपण सजगतेने केला पाहिजे.

तरच आपण त्यातील इंटरनेट बँकिंग सारख्या साधनांचा चांगला फायदा आणि सोशल नेटवर्किंगचा सुद्धा सकारात्मक उपयोग करू शकतो. ऑनलाईन व्यवहार करतांना आपली एखादी चुक फार महागात पडू शकते. जावू दे रे काही होत नाही… असं म्हणून आपण दुर्लक्ष केलं की झालंच… तुमची शिकार होणारच”.

या राष्ट्रीय वेबिनारचे मुख्य संयोजक प्राचार्य डॉ.बाळकृष्ण झावरे, सहसंयोजक पुढारी वृत्तपत्राचे ज्येष्ठ पत्रकार क्रीडा संचालक अनिल दाहोत्रे, शारीरिक संचालक डॉ.योगेश पवार, क्रीडा संचालक डॉ.शिवाजी शिंदे, प्राचार्य अशोक शेळके, प्राचार्य तानाजी जाधव, मामासाहेब मोहोळ महाविद्यालयाचे अधीक्षक हरी सोलंकी यांनी तांत्रिक बाबी सांभाळून वेबिनारचे आयोजन केले.

वेबिनारचे सूत्रसंचालन डॉ.सपना राणे यांनी केले. तर, आभार डॉ. श्रीनिवास इप्पलल्ली यांनी मानले.

संस्थेचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, उपसचिव एल.एम.पवार यांनी वेबिनारचे विशेष कौतुक केले. तसेच वेबिनार घेण्याचा उद्देश व्यक्त करीत विद्यार्थी, शिक्षक, पालक व नागरिकांना फायदेशीर असल्याचे सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.