Mumbai: ‘कोरोना’विरुद्ध लढताना बकरी ईद साधेपणाने, नियम पाळून साजरी करा- मुख्यमंत्री

Mumbai: While fighting against 'Corona', celebrate Bakri Eid simply, following the rules- CM uddhav thackeray कोरोना संकटाचा मुकाबला करण्याचे मोठे आव्हान आहे. सध्याच्या काळात निरोगी जगणे हे महत्त्वाचे आहे. सण-उत्सव साजरा करताना गर्दी होऊ न देणे याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

एमपीसी न्यूज- सण आणि उत्सव हे जीवनाचा आनंद वाढविण्यासाठी असतात. आज एकीकडे कोरोनाची साथ झपाट्याने वाढते आहे, ती रोखण्याचे आटोकाट प्रयत्न आपण करीत आहोत. गेल्या 4 महिन्यांत आपण सर्व धर्मियांचे सण मर्यादित प्रमाणात साजरे केले. त्याचप्रमाणे येणारी बकरी ईददेखील साधेपणाने, जमल्यास प्रतिकात्मकरित्या आणि नियमांचे पालन करून साजरी व्हावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

बकरी ईद संदर्भात आयोजित ऑनलाइन बैठकीत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख तसेच इतर मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी यांनी देखील बकरी ईद साधेपणाने आणि कुठेही गर्दी न करता साजरी करावी, असे आवाहन केले.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, कोरोना संकटाचा मुकाबला करण्याचे मोठे आव्हान आहे. सध्याच्या काळात निरोगी जगणे हे महत्त्वाचे आहे. सण-उत्सव साजरा करताना गर्दी होऊ न देणे याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

तसेच वाहतुकीमुळे साथीचा रोग पसरण्याची शक्यता वाढते. त्यामुळे त्याचा विचार करावा, असेही त्यांनी सांगितले. यावर्षी संकटाचा सामना करून पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात सर्व सण-उत्सव साजरे करू. त्यामुळे बकरी ईद निमित्त बकरी खरेदी करण्यासाठी मंडईचा आग्रह नको.

महाराष्ट्रातील सर्व जनतेने जात-पात, धर्म-पंथ न मानता कोरोनाविरुद्धच्या लढ्यात जे सहकार्य केले, केंद्र व राज्य शासनाच्या नियमांचे पालन केले, त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. यासाठी ज्या यंत्रणा लढल्या, जीवाची जोखीम पत्करली, त्यांचेही उपमुख्यमंत्री पवार यांनी आभार मानले.

ते म्हणाले, आतापर्यंत झालेल्या सर्व सणांमध्ये सर्वांकडून सहकार्य मिळाले. बकरी ईदमध्ये देखील असेच सहकार्य अपेक्षित आहे. धार्मिक भावनांचा आदर करून बकरी ईदसुद्धा साधेपणाने साजरे करावी.

सण साजरे करताना आरोग्याचा विचारदेखील करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री जो निर्णय घेतील, तो जनतेला समजावून देण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.

गृहमंत्री देशमुख म्हणाले, कोरोना साथरोगाविरुद्ध लढाई लढताना गेल्या चार महिन्यात जे सण-उत्सव आले त्यात सर्वांनी खूप चांगले सहकार्य केले आहे. तसेच सहकार्य बकरी ईद निमित्त करावे.

साधेपणाने हा सण साजरा करावा. शक्यतो कुर्बानीचे विधी ऑनलाईन करावेत. आंतरराज्य वाहतूक अवघड आहे. त्याचाही विचार करावा लागेल. कंटेंनमेंट झोन वगैरे अडचणी लक्षात घेता तसेच पोलिसांवरील ताण विचारात घेऊन ईद साधेपणाने करावी.

या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री अस्लम शेख, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, गृहराज्यमंत्री (शहरे) सतेज ऊर्फ बंटी पाटील, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, आमदार अमिन पटेल, रईस शेख, अबू असिम आझमी, झिशान सिद्धिकी यांनी यावेळी मत व्यक्त करून आवश्यक सूचना मांडल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.