Pune: ससून रुग्णालयामध्ये कोरोनाचे आणखी 3 बळी; आतापर्यंत 106 रुग्णांचा मृत्यू

Pune: 3 more victims of corona at Sassoon Hospital; 106 patients have died so far

एमपीसी न्यूज – गेल्या अनेक दिवसांपासून ससून रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढतीच आहे. रविवारी आणखी 3 जणांचा या रोगामुळे बळी गेला. आतापर्यंत या रुग्णालयात 106 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 112 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कसबा पेठेतील 72 वर्षीय पुरुषाचा, येरवड्यातील 70 वर्षीय महिलेचा, धनकवडीतील 72 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या रुग्णांना कोरोना व्यतिरिक्तही निमोनिया आणि इतर आजार होते, अशी माहिती सुसून रुग्णालयाच्या प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

पुणे शहरात कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या 190 च्या आसपास गेली आहे. त्यामध्ये एकट्या ससून रुग्णालयातच शंभरपेक्षा जास्त कोरोनाचे बळी गेले आहेत. रोज 2 ते 3 रुगांचा या रुग्णालयात बळी जात आहे. त्यामुळे हे रुग्णालय म्हटले की कोरोनाच्या रुग्णांना घामच फुटत आहे. सातत्याने मृत्यूदर जास्त असल्याने तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची बदली करण्यात आली. त्यानंतरही मृत्यू काही थांबताना दिसून येत नाही.

ससूनमध्ये गंभीर स्थितीतील रुग्णांना दाखल केले जाते. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांना किडनी विकार, निमोनिया, मधुमेह, उच्च रक्तदाब असे अनेक आजार असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे 60 ते 80 वयोगटातील जेष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

पुणे शहरात रोजच कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. शनिवारी 200 पेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आढळून आले. आता या रुग्णालयाची जबाबदारी जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. कोरोना रुग्णांचे बळी कमी करणे, हे त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.