Pune : रस्ता रुंदीकरणाच्या कामात 36 वीजवाहिन्या तोडल्या, पेठांसह शिवाजीनगरमधील 19 हजार वीज ग्राहकांची वीज खंडीत

एमपीसी न्यूज – गणेशखिंड, शिवाजीनगर परिसरात मेट्रो व उड्डाणपुलासाठी (Pune) रस्ता रूंदीकरणाचे काम सुरु आहे. जेसीबीद्वारे सुरु असलेल्या या खोदकामात गेल्या 20 दिवसांमध्ये तब्बल 36 ठिकाणी महावितरणच्या भूमिगत वीजवाहिन्या तोडण्यात आल्या आहेत. यामध्ये सदाशिव पेठ, नारायण पेठ, शिवाजीनगर, गणेशखिंड परिसरातील सुमारे 19 हजार वीजग्राहकांना खंडित वीज पुरवठ्याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर महावितरणला आतापर्यंत वीज विक्रीमध्ये सुमारे 17 लाख 16 हजार रुपयांचे नुकसान झाले असून वीजग्राहकांचा रोष देखील सहन करावा लागत आहे.

संचेती हॉस्पिटल ते विद्यापीठ रस्त्याबाजूच्या भूमिगत वीजवाहिन्यांमधून (Pune)सदाशिव पेठ, नारायण पेठ, लक्ष्मीरोड, मॉडेल कॉलनी, रेंज हिल्स रोड, आयसीएस कॉलनी, भोसलेनगर, अशोकनगर, साखर संकुल, वाकडेवाडी, एफसी रोड, गणेशखिंड रोड, शिवाजीनगर रेल्वे स्टेशन परिसर, सिमला ऑफीस, हर्डीकर हॉस्पिटल, आकाशवाणी, कासारवाडी या परिसरातील सुमारे 19 हजार ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो.

Pimpri : सकल मराठा समाजाकडून अंबादास दानवे यांना दाखवले काळे झेंडे; पोलिसांकडून धरपकड

मात्र गेल्या 20 दिवसांमध्ये रस्ता रूंदीकरणाच्या खोदकामामध्ये तब्बल 36 ठिकाणी भूमिगत वीजवाहिन्या तोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे या सर्व परिसरातील ग्राहकांना खंडित वीजपुरवठ्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एकाच दिवशी तब्बल 6 ठिकाणी भूमिगत वीजवाहिन्या तोडल्याचे प्रकार घडले आहेत.

यामध्ये गंभीर बाब म्हणजे, रस्ता रूंदीकरणासाठी भूमिगत वीजवाहिन्या स्थानांतरीत करण्याची विनंती महावितरणकडून करण्यात आली होती. मात्र सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या भूमिगत वीजवाहिन्यांवरच रस्ता तयार करण्याचे काम सुरु आहे. खोदकामात वारंवार क्षतीग्रस्त झालेल्या व जोड दिलेल्या वीजवाहिन्या भविष्यात नादुरुस्त झाल्यास वीजपुरवठ्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. या रस्त्याखाली दबलेल्या वीजवाहिन्यांची दुरुस्ती सततच्या वाहतुकीमुळे अतिशय अवघड होईल आणि पर्यायी स्वरुपाचा वीजपुरवठ्याची सोय उपलब्ध करून देताना मोठ्या कालावधीसाठी वीज खंडीत राहू शकेल, अशी स्थिती आहे. यामुळे वीजग्राहक सोबतच महावितरणला देखील मोठा फटका बसणार आहे.

खोदकामात तोडलेल्या वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी तसेच पर्यायी वीजपुरवठ्यासाठी महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांना रात्री बेरात्री धावपळ करावी लागत आहे. पर्यायी वीजपुरवठ्याची सोय उपलब्ध न झाल्यास काही ठिकाणी दोन ते तीन तास वीजपुरवठा खंडित राहत आहे.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.