Pune : स्वाइन फ्लूचे आणखी 6 रुग्ण आढळले

एमपीसी न्यूज – उन्हाचा चटका वाढल्याने स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव काहीसा कमी होत असल्याचे डॉक्‍टरांकडून सांगण्यात येत असले, तरी आता स्वाइन फ्लूचे आणखी 6 रुग्ण आढळले आहेत. पण, त्याची तीव्रता काही अंशी कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यामुळे दररोज 20 ते 25 स्वाइन फ्लूचे आढळणारी रुग्णसंख्या आता पाच ते सहावर आली आहे. बुधवारी (दि.14) शहरात स्वाइन फ्लूचे सहा रुग्ण आढळून आले. दरम्यान, प्रादुर्भाव कमी होत असेल तरीही नागरिकांनी घरातून बाहेर पडताना नाका-तोंडाला रुमाल किंवा मास्क लावूनच बाहेर पडावे. सर्दी, घसा, खोकला आणि ताप ही लक्षणे आढळून आल्यास त्वरीत डॉक्‍टरांकडे जावून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले.

शहरात स्वाईन फ्लूच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मागील दहा महिन्यांत 579 जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. त्यामध्ये काही रुग्णांना प्राणही गमवावे लागले आहे. बुधवारी दिवसभरात 3 हजार 833 लोकांची तपासणी करण्यात आली. तर 50 संशयित लोकांना टॅमीफ्लूचे औषधे देऊन घरी सोडण्यात आले. दरम्यान, अतिदक्षता विभागात 8 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर वॉर्डमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 60च्या वर होती, ती आता 6 वर आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.