Pune: गुड न्यूज! कोविड-19 प्रतिबंधक सहा लशी मानवी चाचणीसाठी उपलब्ध

चाचण्या यशस्वी ठरल्यास सप्टेंबरपर्यंत दहा लाख डोस तयार करणे शक्य, त्यानंतर लक्षणीय उत्पादनवाढ होण्याची शक्यता

एमपीसी न्यूज – सध्या जगभर धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना अर्थात कोविड-19 या रोगावरील प्रतिबंधक लशींच्या मानवी चाचण्यांना ऑक्सफर्ड विद्यापीठात गुरुवारी सुरुवात झाली असून सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियातर्फे देखील या लशी बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या चाचण्या यशस्वी ठरल्या तर ही लस नक्कीच आशेचा किरण ठरणार आहेत.

ऑक्सफर्ड विद्यापीठात गुरुवारी सुरु झालेल्या या चाचणीत सुरुवातीच्या 800 निरोगी स्वयंसेवकांपैकी पहिल्या दोन जणांना  ChAdOx1 nCoV-19 ही लस देण्यात आली. पहिल्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्यांसाठी तयार असलेली ही सहावी लस असून संपूर्ण जगाला मेटाकुटीला आणणाऱ्या या विषाणूच्या विरुद्ध  जालीम इलाज सापडण्याची आशा या लशींमुळे पल्लवीत झाली आहे. या चाचण्या यशस्वी ठरल्यास सप्टेंबरपर्यंत सुमारे दहा लाख डोस तयार होऊ शकतात. तसेच त्यानंतर त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढू शकते.

या चाचण्या सुरु झाल्या असताना पुणेस्थित सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (एसआयआय) ही लस तयार करण्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठाबरोबर सहकार्य केले आहे. यावेळी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला म्हणाले की, येत्या सप्टेंबरपर्यंत ChAdOx1 लशीच्या चाचण्या यशस्वी होण्याच्या शक्यतेमुळे  एसआयआयतर्फे लस तयार करण्यात येणार आहे. या लशीचे आम्ही स्वत:च्या जबाबदारीवर वेगवान उत्पादन करणार असून त्याचे पुरेसे डोस भविष्यात उपलब्ध असतील अशी आम्हाला खात्री आहे.

ही चाचणी नवीन लस सुरक्षित आहे किंवा नाही, तसेच कोरोनाच्या विषाणू विरुद्ध जोरदार प्रतिकारशक्ती निर्माण करु शकते किंवा नाही याचा अभ्यास करणार आहे. जेणेकरुन निरोगी व्यक्तींचे कोरोनापासून संरक्षण होऊ शकेल. ही लस चिंपांझी माकडांमध्ये सापडणा-या सर्दीच्या अॅडिनो व्हायरसपासून बनवण्यात येणार असून त्यात मानवाला संसर्ग होऊ नये या उद्देशाने जनुकीय बदल करण्यात आले आहेत.

याविषयी अधिक माहिती देताना कौन्सिल ऑफ सायंन्टिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चचे संचालक डॉ. अनुराग अग्रवाल म्हणाले की, या प्रकारच्या लशीमध्ये कोरोना विषाणूमधील गुणसूत्रे काढून ती एका कमी ताकदीच्या विषाणूमध्ये सोडली जातात. जेणेकरुन तो विषाणू मानवासाठी जास्त त्रासदायक ठरणार नाही. तसेच हा कमी ताकदीचा अॅडिनो व्हायरस कोरोनाच्या विरुद्ध अँन्टीबॉडीज तयार करेल. त्यामुळे कोरोनाच्या विषाणूविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होईल.

ही लस सुरक्षित आणि सुसह्य असून काही लोकांमध्ये याचे हलके आणि तात्पुरते साईड इफेक्ट दिसू शकतात. ज्यात इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी हात दुखणे, डोकेदुखी, ताप येणे अशी पहिल्या दोन दिवसांत लक्षणे दिसू शकतात.

या ChAdOx1 nCoV-19 लशीकरणामुळे आम्हाला अशी आशा आहे की, मानवी शरीर सार्स व कोविडच्या विषाणूला ओळखून त्याविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करेल ज्यामुळे संसर्ग होऊ शकणार नाही, असे ऑक्सफर्ड व्हॅक्सिन ग्रुपचे संचालक प्रा. अँन्ड्य्रू पोलार्ड यांनी सांगितले. ऑक्सफर्ड विद्यापीठातील व्हॅक्सिनॉलॉजीच्या प्राध्यापिका सारा गिलबर्ट यांनी या लशीच्या यशस्वितेविषयी 80 % खात्री व्यक्त केली आहे.

या संशोधनाविषयी विश्वास व्यक्त करताना जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मुख्य संशोधिका डॉ. सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या की, 18 महिन्यांच्या आत लशीचा वापर करण्यास सुरुवात करणे असे आमचे उद्दिष्ट आहे. सामान्यपणे एखादी लस तयार करण्यास दहा वर्षे लागू शकतात. पण जागतिक स्तरावरील विविध घटकांच्या सहकार्यामुळे हा कालावधी कमी करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. इबेला या विषाणूवर लस तयार करण्यास पाच वर्षे लागली. तसेच झिका विषाणूसाठीच्या लशीला दोन वर्षांपेक्षा कमी अवधी लागला. मात्र कोविड – 19 ची लस फक्त अठरा महिन्यांत उपलब्ध होणे हे अपूर्वच आहे.

मात्र ऑक्सफर्ड येथील संशोधक ही लस सहा महिन्यातच तयार करण्याची आशा बाळगून आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.