Pune : आंबील ओढ्याच्या स्वच्छतेसह पावसाळापूर्वीची 90 टक्के कामे पूर्ण – आयुक्त

90 per cent pre-monsoon works including cleaning of Ambil stream completed - Commissioner

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेचे प्रशासन पावसाळ्यापूर्वी सज्ज आहे. आंबील ओढ्याच्या स्वच्छतेसह पावसाळ्यापूर्वीची 90 टक्के कामे पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.

कोरोनासाठी असलेल्या हेल्पलाईन आपत्कालीन परिस्थितीसाठी वापरण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी कंट्रोल रुमला एकत्रित नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात येणार आहे. तसेच, मलवाहिन्या, नाले व चेंबर्सची स्वच्छता करण्यात आली आहे. साधारण 16 हजार चेंबर्स स्वच्छ करण्यात आले आहेत.

कात्रज तलावातील गाळ काढून खोलीकरण आणि बंधाऱ्याची उंची वाढविण्यात आली आहे, असेही आयुक्तांनी सांगितले.

मागील वर्षी 25 सप्टेंबर रोजी पुणे शहरात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यावेळी आंबील ओढ्याला पूर आला होता. यामध्ये जवळपास 28 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला होता. सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

नाल्याबाहेर आलेल्या रस्त्यांवरून सोसायट्यांमध्ये जवळपास 12 ते 15 फुटांपर्यंत पाणी आले होते. त्यात अनेकांचे संसार वाहून गेले होते. सातारा रोड, सिंहगड रोड, स्वारगेट, धनकवडी, येरवडा, वानवडी, वडगावशेरी भागांत पाणी घुसले होते. अशी दुर्घटना यावर्षी घडू नये, यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयाकडील 15 पथके तैनात करण्यात आली आहेत. महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी उपनगरांत भेटीही दिल्या आहेत. पुण्यात कोरोनाचे संकट निर्माण झाले असताना आता लवकरच पावसालाही सुरुवात होणार आहे.

जून महिन्याची सुरुवात झाल्यानंतर मागील 5 दिवसांपासून पुण्यात पाऊस सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.