Pune: कंटेन्मेंट झोन असलेल्या गावात जाण्यापासून रोखल्याने महिलेची सर्वांसमोर विष प्राशन करुन आत्महत्या

Pune: A woman committed suicide by consuming poison in front of everyone after being prevented from going to a village with a containment zone उंब्रज येथे चार कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने पोलिसांनी येथे नाकाबंदी केली आहे.

एमपीसी न्यूज- कंटेन्मेंट झोन असलेल्या गावात जाण्यावरुन पोलिसांबरोबर झालेल्या वादानंतर एका महिलेने सर्वांसमोर विष प्राशन करुन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना जुन्नर तालुक्यातील (जि. पुणे) उंब्रज नंबर एक येथे घडली. अनुजा रोहिदास शिंगोटे (वय 45) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

अधिक माहिती अशी, शिंगोटे हे शेतकरी कुटुंब असून नियमितपणे छोट्या टेम्पोतून भाजीपाला विक्रीसाठी गावाबाहेर नेत. दरम्यान, उंब्रज येथे चार कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने पोलिसांनी येथे नाकाबंदी केली आहे.

येथे गावात ये-जा करणाऱ्यांची चौकशी केली जाते. मंगळवारी शिंगोटे कुटुंबीय हे उंब्रजला जात होते. नाकाबंदीच्या ठिकाणी पोलिसांनी त्यांना अडवले. गावात जाण्यावरुन पोलीस आणि शिंगोटे कुटुंबीयात वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात अनुजा शिंदे यांनी सर्वांसमोर विष प्राशन केले. त्यांना त्वरीत दवाखान्यात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांनी मृत घोषित केले.

यावेळी नाकाबंदीच्या ठिकाणी हवालदार नरसिंगे, एक होमगार्ड आणि दोन आरसीपी महिला कॉन्स्टेबल बंदोबस्तास होते, अशी माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी सांगितले.

पोलिसांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याची केली होती विनंती

बंदोबस्तास असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी शिंगोटे कुटुंबीयास गावात जाण्यास मनाई करत ग्रामपंचायतीने दिलेल्या पर्यायी मार्गाचा अवलंब करण्यास सांगितले. मात्र, शिंगोटे कुटुंबीयांनी त्याच ठिकाणाहून वाहन नेण्याचा हट्ट धरला होता.

शिंगोटे कुटुंबीय पोलिसांशी वाद घालत होते. त्यांचा वाद पाहून शंभरावर ग्रामस्थ तिथे जमा झाले होते. त्यांनी समजाविण्याचा प्रयत्न केला दरम्यान रोहिदास यांनी विषाची बाटली आणली. ग्रामस्थांनी त्यांना अडविल्याने बाटली खाली पडली. गोंधळात अनुजा यांनी बाटली उचलत विष प्राशन केले.

दरम्यान, सरपंच सपना उमेश दांगट यांनी कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त असल्याचे म्हटले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.