Pune : कोरोना बाधित नसलेल्या भागांत सकाळी 7 ते सायंकाळी 7 सर्व दुकाने होणार सुरू : शेखर गायकवाड

एमपीसी न्यूज – कोरोना नसलेल्या भागांत सर्व दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत सुरू राहणार असल्याचे आदेश काढून महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी पुणेकरांसाठी गुड न्यूज दिली. त्यामुळे कोणत्या दिवशी काय खरेदी करावी, याचे नियोजन पुणेकरांना आता करता येणार आहे.

पुणे शहरात करोनाची वाढत्या रुग्ण लक्षात घेऊन केंद्र व राज्य शासनाच्या आदेशानुसार सर्व निर्णय घेतले जात आहेत. देशभरात मागील ४० दिवसापांसून सर्व व्यवहार ठप्प आहेत. पुण्यातही अशीच परिस्थिती आहे. अर्थ व्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने शासनातर्फे अनेक उपाययोजना करण्यात येत आहे.

जो भाग कोरोना संक्रमित आहे, तिथे अत्यावश्यक सेवेची व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत. तर कोरोना नसलेल्या परिसरात सर्व दुकानं सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.

खबरदारीचा भाग म्हणून रस्ता, कॉलनी व गल्ली परिसरात पाच दुकाने सुरू करता येणार आहेत. प्रत्येक दुकानदाराने नियमांचे पालन करावे. दि. १७ मे पर्यंत देशात लॉकडाउन आहे. तोपर्यंत हे आदेश लागू राहणार आहे.

दरम्यान, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी आता 12 तास सर्व दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने पुणेकरांनी समाधान व्यक्त केले आहे. सध्या प्रचंड उन्हाळा जाणवत आहे. सकाळपासूनच भल्या मोठ्या रांगेत ताटकळत उभे रहाताना पुणेकरांना नाकीनऊ आले होते. त्यामुळे दुकानांची वेळ वाढवून देण्याची मागणी करण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर आयुक्तांचा आदेश महत्वपूर्ण मानला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.