BNR-HDR-TOP-Mobile

Pune : महिला खेळाडूंची कामगिरी प्रेरणादायी – अमृता फडणवीस

एमपीसी न्यूज- ‘आज जेथे प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया अग्रेसर आहेत. क्रीडा क्षेत्रातही त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे. अशा महिला खेळाडूंची कामगिरी ही इतर महिलांसाठी नक्कीच प्रेरणादायी असते.” असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले.

पुण्यातील सहकारनगर येथील ‘ब्लेड्स ऑफ ग्लोरी’ या क्रिकेट संग्रहालयाला त्यांनी आज भेट दिली. यावेळी खास महिला क्रिकेटपटूंना समर्पित विभागाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ‘ब्लेड्स ऑफ ग्लोरी’चे संस्थापक रोहन पाटे, उषा काकडे, अम्रिता पाटे आदि उपस्थित होते.

नेहमी कला आणि फॅशन विश्वात रमणाऱ्या अमृता फडणवीस आज क्रिकेटविश्वातही तेवढ्याच रमल्या होत्या. संग्रहालय बघताना त्यांच्याकडून येणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि आठवणींनी त्यांना या क्षेत्राचीही बरीच माहिती असल्याची जाणीव उपस्थितांना करून दिली. खास महिला क्रिकेटपटूंसाठी समर्पित असणाऱ्या या विभागात सध्या भारताच्या विविध आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूंचे ‘वन डे टी-शर्ट्स’ लावण्यात आले आहेत. यात झुलून गोस्वामी, राजश्री गायकवाड, जेमिमा रॉड्राग्ज, पूनम यादव, दीप्ती शर्मा, एकता बिष्टा आदिंचा समावेश आहे.

“एखाद्याचा छंद जेंव्हा त्याचे ‘पॅशन’ बनते तेंव्हाच असे संग्रहालय निर्माण होऊ शकते.” अशा शब्दात फडणवीस यांनी पाटे यांचे कौतुक केले. “एका क्रिकेट प्रेमीचे ‘पॅशन’ येथे बघायला मिळते. येथील संग्रहीत वस्तू फारच छान आहेत. जगतिकस्तरावरील क्रिकेटपटूंच्या वस्तू येथे बघायला मिळतात. काही काही वस्तू खेळाडूंनी स्वतः त्यांना दिल्या आहेत. पुण्यातील पर्याटनस्थळांमध्ये या संग्रहालयाची भर पडलेली आहे. याकडे आपण विशेष लक्ष द्यायला हवे. भारतातील हे खास ‘क्रिकेट’ या खेळासाठी समर्पित असे पहिले संग्रहालय आहे. त्यामुळे त्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करायला हवे. येणाऱ्या पिढ्यांना हे संग्रहालय नक्कीच प्रेरणादायी ठरेल. त्यासाठी याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.” असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

“आज स्त्रिया सगळीकडेच पुढे आहेत आणि नावही कमवत आहेत. क्रिकेट पुरुषप्रधान खेळ होता. पण आता महिलादेखील खूप चांगले क्रिकेट खेळतात. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला क्रिकेटपटू गेल्या आहेत. याचा खूप आनंद होतो. महिला खेळाडूंसाठी स्वतंत्र विभाग उभारल्याने क्रिकेटचे हे संग्रहालय खऱ्या अर्थाने परिपूर्ण झाल्यासारखे वाटते. यामुळे इतर महिलांनाही प्रोत्साहन मिळेल.” असेही त्या यावेळी म्हणाल्या.

याशिवाय विधानसभेच्या सुरु होऊ घातलेल्या रणधुमाळीचा वेध घेत त्या म्हणाल्या, “मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मतदारसंघात मी नेहमीच प्रचारासाठी जाते तशी या वेळीही जाईन.” “केंद्र सरकारच्या कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाचे मी वैयक्तिकरित्या स्वागत करते. गेली कित्येक वर्ष प्रलंबित असणारा काश्मीर प्रश्न यामुळे मार्गी लागण्याची आशा वाटते.” असेही त्या यावेळी म्हणाल्या.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like