Pune : अभिनेत्याने राजकारण न करता नेहमी रसिकांशी एकनिष्ठ राहावे – प्रशांत दामले

एमपीसी न्यूज – स्वच्छ प्रतिमा आणि सुसंस्कारांच्या आधारे (Pune) अभिनेत्याने राजकारण न करता नेहमी रसिकांशी – एकनिष्ठ राहावे त्याचबरोबर कोणती विचारसरणी असावी याचे देखील त्याला स्वातंत्र्य असावे अशी स्पष्ट भूमिका ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी मांडली. प्रशांत दामले यांना आम्ही सारे ब्राह्मण आणि ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका मासिकाच्या वर्धापदिनानिमित्त ब्राह्मण भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्र चित्पावन संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, मुख्य संपादक भालचंद्र कुलकर्णी, संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक संजय ओर्पे, संचालिका माधुरी कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे हे होते. यावेळी इंदुमती वसंत करिअर भूषण पुरस्कार साहित्यीक व पत्रकार डॉ. सागर देशपांडे यांना, डॉ. रामचंद्र देखणे स्मृती युवा कीर्तनकार पुरस्कार मानसी बडवे यांना व भगवान परशुराम ब्राह्मण संस्था पुरस्कार देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेला प्रदान करण्यात आला. संस्थेचे कार्याध्यक्ष राजेंद्र कुलकर्णी व पदाधिकाऱ्यांनी हा पुरस्कार स्विकारला..

पुरस्कार सोहळ्यानंतर निवेदक राजेश दामले यांनी अभिनेते प्रशांत दामले यांच्याशी मुलाखतीच्या माध्यमातुन संवाद साधला. यावेळी आपली भूमिका सविस्तरपणे मांडताना दामले म्हणाले की, माझे (Pune) गेली 40 वर्षापेक्षा अधिक काळ रसिकांशी नाते आहे. नव्या-जुन्याचा संगम करत व्यावसायिकता जपत रसिकांची निखळ करमणूक केली पाहिजे, त्यासाठीच मी अखिल भारतीय नाट्य परिषदेची निवडणूक लढवली.

नाट्य परिषदेने अखिल भारतीय स्तरावर काम करायला हवे, ठिकठिकाणच्या नाटयगृहांमध्ये अनेक गैरसोयी आहेत. त्या दूर करणे आवश्यक आहे. नाट्य परिषद बदलत्या काळात रसिकांशी जोडण्याची आवश्यकता आहे. वेळेअभावी मी अद्याप आत्मचरित्र लिहिण्याबाबत विचार केलेला नाही. आजच्या मोबाईलच्या जमान्यात पुढील पिढी वाचणार का? हा देखील प्रश्न आहे.

चितळे यावेळी म्हणाले की, ब्राह्मण व्यावसायिक मासिकातील लेखांमुळे व्यावसायिकांची माहिती उपलब्ध होत आहे. ब्राह्मण समाजाने आपल्यात जास्तीत जास्त व्यवसाय करण्यावर भर द्यावा, सहकार्य करण्याची भूमिका ठेवावी, जेणेकरुन व्यवसाय वाढीला हातभार लागणार आहे.

अध्यक्षपदावरुन बोलतांना डॉ. एकबोटे म्हणाले की, ब्राह्मण समाजाच्या बाबतीत 1948 नंतरच्या काळात काय घडले ते चुकीचेच होते, मात्र आपण त्यातून बाहेत येत मोठी मजल मारली आहे. तो काळ आता विसरायला हवा. नविन्यतेचा ध्यास घेत विविध क्षेत्रांत ब्राह्मण समाजाने सतत कार्यरत असायला हवे. आपली भूमिका सर्वसमावेशक व सर्वांना सोबत घेऊन जाणारी हवी.

यावेळी डॉ. सागर देशपांडे आणि सौ. मानसी बडवे यांनी मनोगत व्यक्त केले. संपादक कुलकर्णी यांनी सर्वांचे स्वागत करुन मासिक सुरू करण्यामागची भूमिका मांडली. ग्रामीण भागातील अडचणीत असलेल्या ब्राह्मण समाजाला शहरी भागातील ब्राह्मणांनी आर्थिक मदत केली पाहिजे. सर्व समाजाला जोडण्याचे काम ब्राह्मण समाजाने यापुढील काळात देखील करण्याची आवश्यकता आहे, असे आवाहनही केले. ओर्पे यांनी उपस्थितांचे आभार मानले तर सूत्रसंचालन चैत्राली कुलकर्णी आणि वर्षा कुलकर्णी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.