Pune : बारामती येथे होणाऱ्या नमो महारोजगार मेळाव्यात शिकाऊ उमेदवारांनाही मिळणार संधी

एमपीसी न्यूज – बारामती येथे (Pune) होणाऱ्या पुणे विभागस्तरीय ‘नमो महारोजगार मेळाव्यात’ उपस्थित उद्योगसंस्थांकडून ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी’ योजनेंतर्गत उमेदवारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तसेच मेळाव्यासाठी ऑनलाईन नोंदणी झाली नाही तरी थेट मेळाव्याच्या ठिकाणी नोंदणीची व्यवस्था करुन देण्यात आली आहे, असे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

बारामती येथे येत्या 2 आणि 3 मार्च रोजी पुणे विभागातील पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील उमेदवारांसाठी भव्य ‘नमो महारोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून रोजगार इच्छूक असणाऱ्या दहावी, बारावी, आयटीआय, पदविका, पदवीधर, पदव्युत्तर पदवी आदी पदवीप्राप्त उमेदवारांच्या मुलाखती घेऊन तेथेच त्यांना रोजगाराच्या संधी दिल्या जाणार आहेत. तथापि, शिक्षण पूर्ण झालेल्याच नव्हे तर आय.टी.आय.च्या शेवटच्या वर्षात असलेल्या उमेदवारांनाही कंपन्या शिकाऊ उमेदवारी योजनेंतर्गत रोजगार उपलब्ध करुन देणार आहेत. त्यामुळे या योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांनीही मेळाव्यासाठी उपस्थित रहावे. येताना सर्व उमेदवारांनी ‘बायो डाटा’च्या 10 प्रती आणाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

Hinjawadi: हिंजवडीतून मेट्रो लाईन तीन चे तब्बल साडे तीन लाखांचे साहित्य चोरीला

याशिवाय मेळाव्यात सहभागी होण्यासाठी (Pune) युवक- युवतींना https://rojgar.mahaswayam.gov.in/#/register या लिंकवर नाव नोंदणीचे आवाहन करण्यात आले आहे. तथापि, काही तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाईन नोंदणी करता न आल्यास मेळाव्याच्या ठिकाणी नोंदणीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे ऑनलाईन नोंदणी न झालेल्या रोजगार इच्छुक उमेदवारांनीही मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.