Pune : डॅशबोर्डवर बेडस उपलब्ध मात्र, रुग्णालये दाद देत नाही

Beds are available on the dashboard, but not in the hospital महापालिका सभेत नगरसेवकांनी धरले प्रशासनाला धारेवर 

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. या परिस्थितीत आपल्या डॅशबोर्डवर बेडस उपलब्ध असल्याचे दाखविण्यात येते. प्रत्यक्षात रुग्णांना बेडस मिळत नाही, अशा संतप्त भावना शुक्रवारी महापालिकेच्या ऑनलाइन सभेत नगरसेवकांनी व्यक्त केल्या. 

महापालिका 5 – 5 महिने हॉस्पिटलची बिले देत नाही. येवलेवाडी वॉर्ड ऑफिस अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या कोव्हीड सेंटरचे 40 लाख रुपये बिल देण्यात आले नाही. 200 कोटी रुपये खर्च केल्याचा दावा केला जातो, हे पैसे गेले कुठे असा सवाल मनसेचे गटनेते वसंत मोरे आणि नगरसेवक साईनाथ बाबर यांनी उपस्थित केला. यासंबंधीचा  फ्लेक्सही त्यांनी सभागृहात आणला होता.

महापालिका प्रशासन चांगले काम करीत असताना फाईली का थांबत आहेत, अशीही विचारणा मोरे यांनी केली. हॉस्पिटलवर नुसती कारवाई करून काहीही उपयोग नाही. त्यापेक्षा पुणेकरांना आरोग्याच्या चांगल्या सोयीसुविधा द्या, अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक विशाल तांबे यांनी केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त खुलासा का करीत नाही, पुणे शहर कोरोनामुक्त कधी होणार, अशी विचारणाही तांबे यांनी केली. कोरोनाच्या संकट काळात लोकांच्या जीवाशी खेळ करू नका, चांगल्या सुविधा द्या, अशी मागणी स्वीकृत नगरसेवक सुभाष जगताप यांनी केली. तर, भारती हॉस्पिटल, सिमबायोसिस, सह्याद्री अशा सर्वच हॉस्पिटलचे बिले तपासून नियमाप्रमाणे देण्यात आली आहेत, असा खुलासा अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी केला.

येवलेवाडी वॉर्ड ऑफीसमधून कोरोना सेंटरच्या जेवणाचे बिल देण्यात आले नाही. याप्रकरणी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी वसंत मोरे यांनी केली. त्याची चौकशी करणार असल्याचे आश्वासन रुबल अग्रवाल यांनी दिले. दरम्यान, आज पुणे शहरात कोरोनाचे अभूतपूर्व असे संकट निर्माण झाले असताना रुग्णांना बेडस मिळत नाही. ही गंभीर बाब आहे. खाजगी रुग्णालयात नेमके किती बेडस उपलब्ध आहेत, त्याची वेळच्या वेळी माहिती मिळण्यासाठी महापालिकेतर्फे समानवयक अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.