Pune : खबरदार! प्रवाशांची लूट कराल तर; आरटीओची खासगी बस चालकांना तंबी

 

एमपीसी न्यूज – मराठा आंदोलनामुळे एसटी महामंडळाची ( Pune)  बससेवा विस्कळीत झाली होती. तर दुसऱ्या बाजुला दिवाळी सुट्टीसाठी गावी जाण्यासाठी चाकरमान्यांची एकच घाई सुरु आहे. याचाच फायदा घेत खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी प्रवाशांकडून दुप्पट ते तिप्पट तिकीटदर आकारण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे प्रवासी मेटाकुटीला आले आहेत.

पुण्यातून राज्याच्या विविध भागात जाणाऱ्या प्रवाशांमध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रवाशांची संख्या अधिक असते. ट्रॅव्हल्स चालकांनी बेकायदा दरवाढ करू नये, असे आवाहन आरटीओने केले आहे, मात्र अनेकदा प्रत्यक्षात दरवाढ झालेली असते. यावर्षी पुणे आरटीओने चार वायुवेग पथकाची नियुक्ती केली आहे. हे पथक ट्रॅव्हल्स चालकांच्या कार्यालयात व ट्रॅव्हल्सची प्रत्यक्ष तपासणी करणार आहे. यावेळी काही बेकायदेशीर बाबी निदर्शनास आल्यास थेट कारवाई केली जाणार असल्याची तंबी आरटीओच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Vadgaon : काळजीने देखभाल करणारं कुणीच नसल्याने तीन भावंडे भरकटली

पुणे शहरातून सुमारे 900 ट्रॅव्हल्स राज्याच्या विविध भागात तसेच परराज्यात जाते. यात मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक संख्येने प्रवासी जातात. ट्रॅव्हल्स चालकांनी अशी दरवाढ करू नये. असा प्रकार घडल्यास संबंधित बस व चालकांवर कडक कारवाई केली जाणार आहे. पुण्यातील सर्व खासगी बस मालकांची बैठक आरटीओ कार्यालयात घेण्यात आली. यावेळी चालकांनी सुरक्षित रस्ते प्रवासासाठी संपूर्ण तपासणी करूनच बस रस्त्यावर आणावी तसेच चालकाचे आरोग्य, स्वच्छता आणि वाहतुकीच्या नियमाचे काटेकोर पालन करावे अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

प्रादेशिक परिवहन अधिकारी (प्रभारी) संजीव भोर म्हणाले, “खासगी बस चालकांनी ‘एसटी’च्या तिकीट दराच्या पन्नास टक्क्यांहून अधिक दरवाढ आकारल्यास प्रवाशांनी त्वरित आरटीओशी संपर्क साधावा. या तक्रारींसाठी लवकरच एक हेल्पलाइन क्रमांक जाहीर केला जाणार ( Pune) आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.