Pune : भीम आर्मीतर्फे रविवारी ‘संविधानविरोधी सरकार चले जाव’ महापरिषद

एमपीसी न्यूज- भीम आर्मीतर्फे (बहुजन एकता मिशन, महाराष्ट्र) यांच्या वतीने रविवारी (दि १ सप्टेंबर) ‘संविधानविरोधी सरकार… चले जाव महापरिषद’ आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती संयोजक भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष दत्ता पोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

स्वारगेट येथील गणेश कला क्रीडामंच येथे ही परिषद होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते महापरिषदेचे उद्धाटन होणार आहे. अध्यक्षस्थानी डॉ. कुमार सप्तर्षी असणार आहेत.

दत्ता पोळ म्हणाले “या परिषदेत दिल्ली येथील मुस्लिम विचारवंत वली रहमानी, गणराज्य संघाच्या सुषमा अंधारे,आंबेडकरी विचारवंत कुमार मेटागे हे
प्रमुख वक्ते असणार आहेत. ईव्हीएम हटाव, संविधान बचाव, झुंडशाही, मुस्लिम युवकांच्या हत्या, वाढते दलित अत्याचार, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर
होणारे हल्ले, सांगली-कोल्हापूर पूरपरिस्थितीबाबत बेजबाबदार असलेले सरकार, घटनात्मक संस्थांचा होणार गैरवापर, खासगी क्षेत्रातील आरक्षणाचा
प्रश्न, शेतकरी आत्महत्या आणि कर्जमाफी, झोपडपट्टी धारकांची होणारी फसवणूक यासह भीमा कोरेगाव हल्लाप्रकारणी अद्याप न्यायाच्या प्रतीक्षेत
असलेला समाज अशा विविध मुद्यांवर या महापरिषदेत विचारमंथन होणार आहे.

” केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असून, गेल्या काही निवडणुकात ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार झाल्याची शंका वारंवार उपस्थित होत
आहे. दलित, मुस्लिमांवर हल्ले होत आहेत. सत्ताधारी पक्षातील लोक संविधानाचा अपमान करत असून, संविधान बदलण्याची भाषा करीत आहेत. लोकशाहीचा
गळा घोटण्याचे काम होत असल्याचे गेल्या काही वर्षात घडलेल्या घटनांवरून दिसत आहे. अशा लोकशाही विरोधी आणि संविधानविरोधी सरकारला सत्तेवरून
पायउतार करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी आपण सर्वानी एकत्र येण्याची गरज आहे”

” सत्ताधारी संविधान विरोधी सरकारला हटविण्यासाठी समविचारी पक्ष, राजकीय संघटनानी एकत्र यावे. महाआघाडी झाल्यास भीम आर्मीला पुण्यातील
कॅंटोन्मेंटसह परभणी, अमरावती आणि नवी मुंबई येथून पाच जागा मिळाव्यात.महाआघाडी झाली नाही, तर राज्यातील अनेक मतदारसंघात आमची ताकद चांगली असून, तेथे उमेदवार उभे केले जाणार आहेत” निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने संघटनात्मक पातळीवर तयारी करण्यात येत असल्याचेही पोळ म्हणाले.

पत्रकार परिषदेला महिला आघाडीच्या नीता आडसुळे, उपाध्यक्ष हुसेन शेख, मुकेश गायकवाड, संपर्कप्रमुख प्रदीप कांबळे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.