Pune News : पादचारी दिन साजरा करणारे ‘पुणे’ देशातील पहिले शहर

एमपीसी न्यूज – लक्ष्मी रस्त्याचा झालेला खुला मॉल, शहरात ठिकठिकाणी सजलेले रस्ते, पादचारी मार्गांच्या सोडवलेल्या समस्या आणि रस्त्यावर चालण्यासाठी पुणेकरांचा मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद, अशा उत्साहपूर्ण वातावरणात शनिवारी पुण्यातील पहिला पुणे महापौर पादचारी दिन साजरा करण्यात आला. शिवाय या पादचारी दिनासोबतच पुणे पादचारी दिन साजरा करणारे देशातील पहिले शहर बनले.

पुणे शहरातील ठिकाणी 500 मी लांबीचे रस्ते पादचारीपूरक निर्माण करणे, चौक पादचारी सुरक्षितता लक्षात घेऊन सुधारणा कामे करणे आणि सुरक्षित मिड ब्लॉक क्रॉसिंग सुधारणा कामे करणे या पादचारी अनुषंगे कामांचा समावेश होता.

सर्वात महत्त्वाचा उपक्रम लक्ष्मी रस्त्यावर ‘ओपन स्ट्रीट मॉल’ ही संकल्पना घेऊन नगरकर तालीम चौक ते उंबऱ्या गणपती चौक या सुमारे 400 मी लांबीचा रस्ता पूर्णतः वाहनासाठी बंद करून पादचारी नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आला.

सकाळी 11 वाजता मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या उपक्रमाला सुरुवात झाली. यावेळी हेमंत रासने, (स्थायी समिती अध्यक्ष), मा.विक्रमकुमार ( महापालिका आयुक्त), मा.कुणाल खेमणार ( अती. म.आ ) यांच्या उपस्थितीत सर्व लांबीमध्ये पादचारी कामांची पाहणी करण्यात आली.

संपूर्ण रस्त्यावर दोन्ही बाजूचे फूटपाथ पादचाऱ्यांसाठी मोकळे करण्यात आली होती. रस्त्याच्या दोन्ही कडेला रंगीत रचना व त्यामध्ये पथारी व्यावसायिक यांना जागा देण्यात आली होती.रस्त्यावर विविध ठिकाणी आकर्षक झाडे, फुले यांच्या कुंड्या ठेवण्यात आल्या. रस्त्यावर लहान मुलांना खेळण्याचे स्वरूपात प्रशिक्षण सेफ किड्स संस्थेद्वारे सोय करण्यात आली होती.

सकाळी 11 ते संध्याकाळी 4 पर्यंत नागरिकांनी उस्पुर्तपणे सहभागी होऊन या संकल्पनेस प्रतिसाद दिला. नागरिकांनी मुक्त स्वरूपात विहार व खरेदीचा आनंद घेतला. व्यापारी, पथारी व्यावसायिक व नागरिकांनी या संकल्पनेस चांगला पाठिंबा दिला. लोकांच्या सूचना व प्रतिक्रिया यातून यापुढे पुणे शहरात पादचारी सुविधा आणखी चांगल्या स्वरूपात निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

पादचारी दिन हे केवळ निमित्त : महापौर मोहोळ

पादचारी दिन हे केवळ एकदिवसीय निमित्त असले तरी या निमित्ताने पादचाऱ्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी, शहरातील पादचारी मार्गांची दुरुस्ती व्हावी, झेब्रा क्रॉसिंग रंगवले जावेत, भुयारी मार्गांची दुरुस्ती व्हावी, भुयारी मार्गातील विद्युत व्यवस्था आणि सीसीटीव्ही यंत्रणा सुरु व्हावी, असे अनेक उद्देश या आयोजनामागे होते, असे महापौर मोहोळ यांनी यावेळी सांगितले.

पाषाण-सुस रस्त्यावर ‘स्ट्रीट फॉर पीपल’

केंद्र शासनाच्या उपक्रमात भाग घेऊन पाषाण-सुस रस्त्यावर ‘स्ट्रीट फॉर पीपल’ ही संकल्पना निर्माण केली आहे. अभिनव आर्ट कॉलेज ते मुंबई-पुणे हायवे पर्यंत सुमारे 500 मी लांबीचा रस्ता विकसित केला आहे. या रस्त्यावर वाहनासाठी तीन लेन, स्वतंत्र सायकल मार्ग, प्रशस्त पादचारी मार्ग आणि रस्त्याच्या कडेला ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था निर्माण केली असून व्यायामाची साधने, स्केट बोर्ड खेळणेची सुविधा, रोलर स्केटिंग खेळण्यासाठी सुविधा, लहान मुलांना अर्बन 95 संकल्पनेवर आधारित खेळणेची साधने, फ्लोअर गेम उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.