Pune Corona News : पुणेकरांना कुठल्याही प्रकारे बेडची कमतरता भासणार नाही : अजित पवार

कोविड रुग्णालय उभारणीसाठी ज्यांची मोलाची साथ मिळाली त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या संकट काळात पुणेकरांना कुठल्याही प्रकारे बेडची कमतरता भासणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केले.

पुणे महापालिकेच्या बाणेर येथील कोविड रुग्णालयाचे उदघाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार गिरीश बापट, आमदार चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, आ. सिद्धार्थ शिरोळे, भिमराव तापकीर, माजी महापौर मुक्ता टिळक, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल आदी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, कोरोना बाधित रुग्णसंख्या कमी करण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात सर्व सोयी सुविधा, ऑक्सीजनयुक्त बेडची व्यवस्था असणारे कोविड रुग्णालये सुरु करण्यात येत असून या रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा आज पार पडत आहे.

रुग्णालयाच्या उभारणीमध्ये उद्योजक, महापालिकेचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना या सर्वांनी चांगले काम केले आहे. यांच्या माध्यमातून चांगली आरोग्य सेवा दिली जाईल. या कोविड रुग्णालयामुळे पुणेकरांना याचा चांगला उपयोग होईल.

सर्वांनी तोंडाला मास्क लावणे, सामजिक अंतर राखणे या नियमांचे देखील पालन केले पाहिजे. जिल्ह्यातील कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर व्हावे, असेही ते म्हणाले. कोविड रुग्णालय उभारणीसाठी ज्यांची मोलाची साथ मिळाली त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, अतिशय चांगले रुग्णालय उभारल्याबद्दल मी पुणे महापालिकेला प्रथम शुभेच्छा देतो. ज्यांनी या कामासाठी मदत केली त्यांचेही मनःपूर्वक अभिनंदन.

खूप चांगली व्यवस्था या ठिकाणी केली गेली असून पुणे महापालिकेने जास्तीत जास्त तपासण्या करुन कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणावी, असेही ते म्हणाले.

यावेळी पुणे महापालिकेचे अधिकारी, वैद्यकिय अधिकारी, कर्मचारी, परिसरातील नागरिक उपस्थित होते. प्रास्ताविक महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.