Pune Corona News : रेमडेसिवीरसह ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करा : महापौर मोहोळ

महापौरांची पदाधिकाऱ्यांसह विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांची भेट

एमपीसीन्यूज : पुणे शहरात सद्यस्थितीत कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महाराष्ट्र शासन आणि पुणे महानगरपालिका यांच्या सहकार्याने विविध पातळीवर यासंदर्भात उपाययोजना राबवित आहे. मात्र, शहरातील वाढती रुग्णसंख्या पाहता रेमडेसिवीर इंजेक्शन्स आणि ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा हे आमच्या समोरील सर्वात मोठे आव्हान आहे, त्यामुळे रेमडेसिवीर आणि मुबलक प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध करून द्यावेत’, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विभागीय आयुक्त सौरव राव आणि जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे केली.

तसेच रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनसाठी पूर्ण निधी देऊ फक्त दोन्हींचा साठा उपलब्ध करून द्यावा, असेही महापौरांनी स्पष्ट केले.

महापौर मोहोळ यांच्यासोबत सभागृह नेते गणेश बीडकर आणि स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने हेही उपस्थित होते. रेमडीसिविर आणि ॲाक्सीजन या दोन्हींचे नियंत्रण राज्य सरकारच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आहे.

याबाबत माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘शहरातील नागरिकांसाठी जास्तीत जास्त कोरोना टेस्टींग करण्याबरोबर रुग्णांसाठी ऑक्सिजन बेड्स, आयसीयू बेड्सची उपलब्धता आणि नागरिकांचे लसीकरण आम्ही युद्ध पातळीवर करत आहोत. महापालिकेच्या स्तरावर महापालिका हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. याशिवाय खाजगी हॉस्पिटल्सचे सुध्दा 80 % बेड्स ताब्यात घेऊन रुग्णांवर उपचार चालू आहेत.

परंतु सद्यस्थितीत कोरोना रुग्ण संख्येच्या तुलनेल रेमडेसीवीर इंजेक्शन्सचा पुरवठा अत्यल्प आहे. परिणामी रेमडेसीवीर इंजेक्शनच्या अभावी बहुसंख्य रुग्ण आपले प्राण गमावत आहेत, ही अत्यंत दु:खद बाब आहे. शिवाय प्रतिदिन 250  मेट्रिक टन ऑक्सिजनची शहराला गरज आहे. त्यामुळे ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवणे आवश्यक आहे.’

‘महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत रेमडेसीवार इंजेक्शनचा साठा उपलब्ध करून दिल्यास, पुणे महानगरपालिकेतर्फे स्व:खर्चाने ही सर्व इंजेक्शन्स विकत घेऊन शहरातील रुग्णांकरिता उपलब्ध करुन देण्याचा आमचा मानस आहे. यासाठी आम्ही विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन विनंती केली आहे,’ असेही महापौर मोहोळ म्हणाले.

पुण्यातील रुग्णालयांच्या ऑक्सिजन यंत्रणेच्या ऑडिटचे महापौरांचे आदेश !

नाशिकच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील सर्व रुग्णालयांच्या ऑक्सिजन यंत्रणेचे फायर ऑडिटच्या धर्तीवर ऑडिट करावे, असे आदेश महापौर मोहोळ यांनी प्रशासनाला दिले आहेत. शिवाय या संदर्भातील अहवाल सादर करावा, अशा सूचनाही मोहोळ यांनी प्रशासनाला केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.