Pune : ‘कोरोना’ संकटाला यशस्वीपणे परतवू – मुरलीधर मोहोळ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधला पुणेकरांशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद; नायडू रुग्णालयातील डॉक्टरांचे-कर्मचाऱ्यांचे मानले विशेष आभार

एमपीसी न्यूज – ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत असून राज्य सरकारशी उत्तम समन्वय साधून काम सुरू आहे. अफवा, गैरसमज यावर विश्वास न ठेवता आलेल्या संकटाला पुणेकर म्हणून एकत्र येऊन सामोरे जाऊयात आणि संकटाला यशस्वीरित्या परतवून लावूया, असा निर्धार महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महापौर मोहोळ यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पुणेकरांशी संवाद साधला. गेल्या दीड महिन्यांपासून महानगरपालिकेच्या माध्यमातून नायडू हॉस्पिटलमध्ये उभारण्यात आलेल्या स्वतंत्र कक्ष, उपलब्ध यंत्रणा आणि आताच्या घडीला युद्धपातळीवर सुरु असलेल्या कामांची सविस्तर माहिती दिली.

पुणेकरांशी संवाद साधताना महापौर मोहोळ म्हणाले की,’कोरोना प्रादुर्भावाच्या आपण दुसऱ्या टप्प्यात असून आपल्याला इथेच थांबायचे आहे. पुण्यातील रुग्णसंख्या लक्षात घेता आपण कोरोनाच्या प्रादुर्भावावर उत्तम नियंत्रण ठेवले आहे. मात्र हे संकट परतवून लावण्यासाठी आपल्या सर्वांना सामूहिक प्रयत्न अधिकची जबाबदारी घेऊन करावे लागणार आहेत. दिलेल्या सूचनांचे पालन करणे, प्रशासनाला सहकार्य करणारे आणि वैयक्तीक खबरदारी घेणे आवश्यक आहे.’

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देताना येत्या रविवारी २२ मार्च रोजी सकाळी ७ ते रात्री ९ वाजता ‘जनता कर्फ्यू’ ला पुणेकरांनी प्रतिसाद दद्यावा, असे आव्हानही महापौरांनी फेसबुक युजर्सना केले.

डॉक्टर्स आणि टीमचा होणार सत्कार…
कोरोच्या पार्श्वभूमीवर अहोरात्र काम करणाऱ्या नायडू रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सेस आणि कर्मचारी यांच्या कृतज्ञतापर पुणेकरांच्या वतीने महापौर मोहोळ सन्मान करणार आहेत. रविवारी जनता कर्फ्युच्या दिवशी ५ वाजता नायडू रुग्णालयात जाऊन हा सन्मान केला जाणार आहे?

अनिवार्य क्वारंटाईनला सुरुवात…
महापौर मोहोळ यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे मागणी केली होती की विदेशातून आलेल्या प्रवाशांना क्वारंटाईन केले जावे. आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना केलेल्या या मागणीनंतर मुख्य सचिवांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपल्या मागणीनुसार अनिवार्य क्वारंटाईनच्या सूचना दिल्या. त्यामुळे महापौरांच्या मागणीला यश आले असून त्याच पार्श्वभूमीवर दुबईहुन आलेल्या विमानांमधील 115 प्रवाशांपैकी 114 प्रवाशांना खबरदारी म्हणून महापालिकेच्या माध्यमातून तयार केलेल्या विलगीकरण कक्षात ठेवले गेले आहे. जर कोणी संसर्गजन्य रुग्ण असेल तर त्यामुळे संसर्ग कमी होऊन, संभाव्य धोक्यापासून बचाव करू शकेल. तर एका प्रवाशाला खोकल्याचा त्रास जाणवत होता. त्याला तात्काळ नायडू हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांचे सॅम्पल घेतले गेले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.