Pune Crime News : मुळशीत गांजाची शेती उद्धवस्त, 11 लाख 63 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – मुळशीत अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत, गांजाची शेती उद्धवस्त केली आहे. पौडजवळील अंबरवेट परिसरात गांजाची शेती करणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून गांजाची 250 झाडे, 18 किलो गांजा व इतर असा 11 लाख 63 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

चेतन मारूती मोहोळ (वय 27, रा. कानिफनाथ सोसायटी, कोथरूड), साहेबा हुल्लाप्पा म्हेत्रे (वय 20, रा. कोथरूड), प्रकाश वाघोजी खेडेकर (वय 35) आणि इंदुबाई वाघोजी खेडेकर (वय 65, रा. दोघेही- गवळीवाड़ा, अंबरवेट, पौड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थ विरोधी पथकाने मोहोळ व म्हेत्रे याला शुक्रवारी कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत संशयावरून गांजा विक्री करताना अटक केली होती. त्यांच्याकडून 580 ग्रॅम गांजा मिळाला होता. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी त्यांनी पौड परिसरातील अंबरवेट येथून गांजा आणल्याचं सांगितलं.

अमली पदार्थ विरोधी पथकाने अंबरवेट येथे जाऊन प्रकाश खेडेकर याच्या घरी तहसीलदार यांच्या उपस्थितीमध्ये घराची झडती घेतली. त्यावेळी घरात 18 किलो 995 ग्रॅम ओलसर हिरवट, काळसर बोंडे, फांद्या आणि पाने मिळाली. या ठिकाणाहून खेडेकर दाम्पत्याला पकडून चौकशी केली. त्यावेळी घराजवळील जागेत गांजाची शेती केली असल्याचे आढळून आलं. त्या ठिकाणी पोलिसांना 250 तयार गांजाची झाडे आढळून आली आणि पोलिसांनी 154 किलो गांजा जप्त केला..

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.