Pune Crime News : गारवा हॉटेल मालकाच्या खून प्रकरणातील दहा आरोपींवर मोक्का, पोलीस आयुक्तांची कारवाई

एमपीसी न्यूज – पुणे-सोलापूर रस्त्यावरील प्रसिद्ध हॉटेल गारवाचे मालक रामदास आखाडे यांचा काही दिवसांपूर्वी कोयत्याने सपासप वार करून खून करण्यात आला होता. हॉटेलच्या व्यावसायिक स्पर्धेतून हा खून करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 10 दहा जणांना अटक केली असून त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) नुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आदेश दिले आहेत. 

बाळासाहेब जयवंत खेडेकर (वय 56), निखिल बाळासाहेब खेडेकर (वय 24), सौरभ ऊर्फ चिम्या कैलास चौधरी (वय 21), अक्षय अविनाश दाभाडे (वय 27), करण विजय खडसे (वय 21), प्रथमेश राजेंद्र कोलते (वय 23), गणेश मधुकर माने (वय 21), निखिल मंगेश चौधरी (वय 20), निलेश मधुकर आरते (वय 21) व काजल चंद्रकांत कोकणे (वय 19) अशी मोक्कानुसार कारवाई करण्यात आलेल्याची नावे आहेत. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यात रामदास आखाडे (वय 36) यांचा खून झाला होता.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पुणे-सोलापूर रस्त्यावर मृत रामदास आखाडे यांचे गारवा हॉटेल आहे. या हॉटेल पासून काही अंतरावर आरोपी बाळासाहेब खेडेकर याचे देखील हॉटेल आहे. गारवा हॉटेलमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी होत असे. त्याचा परिणाम खेडकर याच्या हॉटेलवर होत असे. त्यामुळे आखाडे याचा खून केला तर गारवा हॉटेल बंद पडेल आणि आपल्या हॉटेलचा व्यवसाय वाढेल असा विचार करून बाळासाहेब खेडेकर यांनी रामदास आखाडे यांचा खून करण्याची सुपारी दिली होती.

त्यानुसार गुन्हेगार निलेश आरती आणि त्याच्या साथीदाराने रामदास आखाडे याच्यावर कोयत्याने सपासप वार करत खून केला होता. या गुन्ह्यात एका अल्पवयीन मुलासह 11 जणांना पकडले गेले होते. त्यात तपासात करत असताना आरोपींनी संघटित गुन्हेगारी कारवाया केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी त्यांच्यावर मोक्कानुसार कारवाई करावी, असा प्रस्ताव परिमंडळ पाचच्या उपायुक्त नम्रता पाटील यांच्याकडे पाठवला होता. त्यांनी हा प्रस्ताव अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांना पाठवला. त्यांनी प्रस्तवाची छाननी केली व पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली या टोळीवर मोक्काची कारवाई केली आहे.

सर्व आरोपी सध्या येरवडा कारागृहात आहेत. तर अल्पवयीन मुलगा हा सुधार गृहात आहे. मोक्का कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी 42 वी मोक्का कारवाई आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.