Pune Crime News: गुंड संतोष जगताप याच्यावरील हल्ल्यात जखमी झालेल्या अंगरक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू

एमपीसी न्यूज – लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 22 ऑक्टोबरला कुख्यात गुंड आणि वाळू व्यावसायिक संतोष जगताप याच्यावर झालेल्या खुनी हल्ल्याच्या वेळी गोळी लागून गंभीर जखमी झालेल्या अंगरक्षकाचा उपचारादरम्यान मुंबईतील एका रुग्णालयात काल (मंगळवारी) मृत्यू झाला.

अश्विनी कुमार उर्फ मोनुसिंग अरूण कुमार सिंग (वय 35) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. या हल्ल्यात संतोष जगताप याचा जागीच मृत्यू झाला होता तर गोळी लागल्याने त्याचा अंगरक्षक मोनुसिंग गंभीर जखमी झाला होता. मुंबईतील एका मोठ्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. परंतु मंगळवारी मृत्यू झाला. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मोनुसिंग हा मुळचा लखनौमधील होता. तो वाळू व्यावसायिक व गुंड संतोष जगतापचा बॉडीगार्ड म्हणून काम करत होता. 22 ऑक्टोबर रोजी त्याच्यावर लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हॉटेल सोनाई समोर दबा धरून बसलेल्या चार हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार केला होता. संतोष जगताप याचा या हल्ल्यात जागीच मृत्यू झाला होता. तर, मोनुसिंग देखील या गोळीबारात गंभीर जखमी झाला होता. दरम्यान, प्रत्युत्तरात जगतापच्या बॉडीगार्डने केलेल्या गोळीबारात एका हल्लेखोराचा जागीच मृत्यू झाला होता.

या घटनेत मोनुसिंग याला दोन गोळ्या लागल्या होत्या. त्याला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, त्याची प्रकृती चिंताजनक होती. त्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथील एका रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.