Pune Crime News : बँकेतून सव्वा दोनशे कोटी रुपये लाटण्याच्या तयारीत असणारी टोळी जेरबंद
एमपीसीन्यूज : पुणे शहरातील खाजगी बँकांच्या निष्क्रिय खात्याचा डेटा चोरून त्याआधारे तब्बल सव्वा दोनशे कोटी रुपयांचा अपहार करण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांच्या सायबर शाखेने पर्दाफाश केला. याप्रकरणी पोलिसांनी दहा जणांना अटक केली. यातील चार आरोपी हे सॉफ्टवेअर अभियंते आहेत. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अनेक खाते धारकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
रविंद्र महादेव माशाळकर (वय 34, अंबाजोगाई रोड, लातूर), आत्माराम हरिश्चंद्र कदम (वय 34, मुंबई) मूकेश हरिश्चंद्र मोरे (वय 37, येरवडा), राजशेखर यदैहा ममीडा (वय 34, हैदराबाद), रोहन रवींद्र मंकणी (37, सहकारनगर), विशाल धनंजय बेंद्रे (वय 45, वाशीम), सुधीर शांतालाल भटेवरा उर्फ जैन (वय 54, सिंहगड रोड), राजेश मुन्नालाल शर्मा (वय 42, औरंगाबाद), परमजित सिंग संधू (42, औरंगाबाद) व अनघा अनील मोडक (वय 40, वडगाव बुद्रुक) अशी आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे यांनी फिर्याद दिली आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपींनी संगनमत करून काही नामांकित बँकातील डोरमंट अकाउंटची (निष्क्रिय खाते) माहिती अनधिकृतपणे मिळवली होती. या सर्व बँक खात्यात जवळपास 216 कोटी 29 लाख रुपये होते. चोरलेली ही सर्व माहिती ते एका व्यक्तीला विक्री करून त्यातून कोट्यवधी रुपयांची कमाई करणार होते.
पुणे पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाला या सर्व गुन्ह्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील एका नामांकित सोसायटीवर छापा टाकून दहा आरोपींना ताब्यात घेतले. या ठिकाणाहून पोलिसांनी 11 मोबाईल फोन, रोख 25 लाख, 1 क्रेटा, डस्टर कार व एक मोपेड असा तबल 43 लाख 54 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास सायबर क्राईम विभागाचे पोलीस निरीक्षक कुमार घाडगे करीत आहे.