Pune Crime News : कुकचे अपहरण करून खंडणीची मागणी करणाऱ्या तिघांना अटक

एमपीसी न्यूज – हॉटेलमधील काम संपल्यानंतर दुचाकीवरून घरी निघालेल्या कुकचे अपहरण करून हॉटेल मालकाकडे दहा हजार रुपये खंडणीची मागणी करणाऱ्या तिघांना चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. खराडी बायपास परिसरात शुक्रवारी सायंकाळीच्या सुमारास ही घटना घडली होती. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपींचा छडा लावून त्यांना अटक केली आहे. 

विनोद चव्हाण, मनोहर काशिराम जाधव आणि मुकेश मनोज जाधव अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.  विश्वजीत पाल असे अपहरण झालेल्या कुकचे नाव आहे. या प्रकरणी अशोक गगन तलवार यांनी चंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विश्वजित पाल हा फिर्यादी तलवार यांच्या हॉटेलमध्ये स्वयंपाक बनवण्याचे काम करतो. शुक्रवारी काम संपल्यानंतर तो दुचाकीवरून घरी निघाला होता. यावेळी आरोपींनी खराडी बायपास जवळ त्याला मारहाण करून रिक्षामध्ये टाकले आणि त्याचे अपहरण केले. त्याला चंदननगर येथे जंगल परिसरात नेले आणि पैशाची मागणी करत त्याला मारहाण केली. परंतु, विश्वजीतने आपल्या जवळ पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर आरोपींनी हॉटेल मालकाकडून पैसे मागून घेण्यास त्याला सांगितले अन्यथा तुझ्या जीवाचे बरे वाईट करणार आहोत, असे मालकाला सांग असे सांगितले.

दरम्यान, विश्वजीतने मालकाला फोन करून हा प्रकार सांगितला. परंतु, सुरुवातीला मालकाला हा प्रकार खोटा वाटला. त्यांनी विश्वजीत गेल्या रस्त्यावरून जात पाहणी केली असता त्याची दुचाकी पडल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दिली. चंदननगर पोलिस आणि घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ आरोपींचा शोध सुरू केला. चंदननगर येथील जंगल परिसरातून तीन आरोपींना ताब्यात घेतले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.