Pune: कोरोनाच्या संकटामुळे पुणेकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न पडले लांबणीवर

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकडाऊन जाहीर केल्यानंतर पुणे मेट्रोचे काम थांबले होते. साधारण जून महिन्यात पुणेकरांना मेट्रोत बसता येणार असल्याचे स्वप्न महामेट्रोतर्फे दाखविण्यात आले होते. मात्र, हे स्वप्न सध्या शक्य नाही. मेट्रोचे काम आता वेगाने सुरू आहे. पुढील काही आणखी महिने पुणेकरांना मेट्रोत बसण्याची प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

मेट्रोची ट्रायल रन झाल्यानंतर जूनच्या शेवटी वनाज ते रामवाडी या मार्गावर आयडिएल- गरवारे कॉलेज दरम्यान मेट्रो धावणार असल्याचे महामेट्रोतर्फे सांगण्यात आले होते. पण, लोकडाऊन सुरू असल्याने हे स्वप्न आता आणखी लांबणीवर गेले आहे. महामेट्रोतर्फे वणाज ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट या दोन मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे.

काही महिन्यांपूर्वी मेट्रोचे रेक दाखल झाल्यानंतर पिंपरीत वल्लभनगर परिसरात पहिली चाचणी घेण्यात आली होती. त्यामुळे आता लवकरच मेट्रो धावणार असल्याचे संकेत पुणेकरांना देण्यात आले होते. मार्च महिन्यात जाहीर झालेल्या लोकडाऊनचा फटका मेट्रोच्या कामालाही बसला आहे. पिंपरी ते स्वारगेट मार्गावरील संत तुकाराम नगर – फुगेवाडी मार्गही जून अखेर तर, आरटीओ ते येरवडा डिसेंबर 2020 पर्यंत मेट्रो सुरू होणार असल्याचे म्हटले होते.

सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीतून बाहेर पडल्याशिवाय मेट्रोच्या कामाल गती येऊन प्रत्यक्ष मेट्रो सुरू होणे शक्य नाही. सध्याची पुण्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता, कोरोनाचे संकट आणखी किती दिवस राहणार, याबाबत कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. लॉकडाऊनला दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्रशासनाने घेतला आहे. मेट्रोचे काम वेगाने पूर्ण करून घेतले तरी रेड झोनमध्ये मेट्रोसह सर्व प्रकारच्या सार्वजनिक वाहतुकीला मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे मेट्रोत बसण्यासाठी पुणेकरांना कोरोनाचे संकट दूर होण्याची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.