Pune : उंड्री येथे भीषण आगीत फर्निचरचे गोदाम भस्मसात

एमपीसी न्यूज –  उंड्री येथे आज (रविवारी) पहाटे चारच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत एका लाकडी फर्निचरचे गोदाम जळून खाक झाले. पुणे महापालिका व पीएमआरडीए अग्नीशमन दलाच्या एकूण आठ फायरगाङ्याच्या मदतीने ही आग विझवण्यात आली. 

उंड्री येथे ईश्वर कड यांच्या मालकीच्या ‘हॅशवूड’ या गोदामाला मोठी आग लागल्याची माहिती पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलास पहाटे 3 वाजून 50 मिनिटांनी मिळाली. त्यानंतर स्टेशन ड्युटी ऑफिसर प्रकाश गोरे हे तीन फायरगाड्या व दोन बंबांसह घटनास्थळी पोहचले, मात्र आगीने तोपर्यंत रौद्ररुप धारण केले होते. आगी लागलेले गोदाम सुमारे चार हजार चौरसफूट क्षेत्राचे असल्याने चारही बाजूने पाणी मारणे आवश्यक असल्याने गोरे यांनी पीएमआरडी अग्नीशमन दलाशी संपर्क साधून तातडीने मदत मागवून घेतली.

या दुर्घटनेत कोणीही जखमी नसल्याचे अग्नीशमन दलाचे स्टेशन ड्युटी ऑफिसर प्रकाश गोरे यांनी सांगितले. गोदामात लाकूड, फोम, कागदपत्रे असे साहित्य असल्याने आग लगेच भडकली. आग एवढी भीषण होती की गोदामाचे लोखंडी शेड देखील त्यात वितळून खूप मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.