Pimpri: परदेशातून आलेल्या बाधित रुग्णाच्या संपर्कातील स्थानिक कुटुंबातील चौघांना कोरोना विषाणूची बाधा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडमध्ये काल नव्याने आढळलेल्या कोरोना विषाणू बाधित पाचजणांमध्ये थायलंडला जाऊन आलेल्या एका प्रवाशाचा समावेश आहे तर यापूर्वी शहरात आढळलेल्या तीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांपैकी एकाच्या संपर्कात आलेल्या स्थानिक कुटुंबातील चौघांना देखील कोरोना विषाणूची बाधा झाल्याची माहिती पुढे आली आहे. शहरात कोरोना बाधित आठही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

नव्याने सापडलेल्या कोरोनाबाधित पाच रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती प्रशासनाने घेतली असली असून त्यांच्यापर्यंत पोहचून त्यांचीही तपासणी करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, यासाठी शहरातील शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहे. मॉल, चित्रपटगृहे, उद्याने, अभ्यासिका, वाचनालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे तसेच स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढून 15 तर राज्यातील संख्या 31 वर जाऊन पोहचली आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 15 झाल्याच्या वृत्तास आज रात्री उशिरा दुजोरा दिला.

पिंपरी-चिंचवडमधील 41 संशयित रुग्णांच्या घशातील द्रावाचे नमुने राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेत (एनआयव्ही) चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी पाच नमुने पॉझिटीव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमधील चिंता देखील वाढू लागली आहे. उर्वरित 36 नमुन्यांच्या तपासणीचे अहवाल प्राप्त व्हायचे असून त्याबाबत उत्सुकता वाढली आहे.

संबंधित आणखी बातम्या वाचा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.