Pune : गॅस कंटेनरला झालेल्या अपघातामुळे प्रचंड प्रमाणात गॅस गळती तर वाहतूक विस्कळीत

एमपीसी न्यूज – गॅस टँकरला झालेल्या अपघातात गॅस गळती होऊन परिसरात उग्र वास पसरला. हा अपघात आज शनिवारी (दि.1) सकाळी सव्वासहाच्या दरम्यान नवले पुलाजवळ घडला. गॅसगळती झाल्यामुळे साताऱ्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, आज, शनिवारी सकाळी नवले पुलाजवळून बॉयलरसाठी वापरण्यात येणारा प्रॉपलीन गॅस घेऊन एक टँकर केरळहून मुंबईच्या दिशेने निघाला होता. त्यावेळी टँकरच्या व्हॉल्वला शेजारुन जाणारे वाहन घासून गेल्यामुळे कंटेनरमधून गॅस गळतीला सुरूवात झाली. त्यामुळे उग्र वास पसरून परिसरात घबराट पसरली.

घटनेची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी एका सुरक्षित ठिकाणी कंटेनर नेऊन सर्वतोपरी प्रयत्न करून गळती बंद करण्याचा प्रयत्न केला. परंतु आतील गॅसचा दबाब अत्यंत जोरदार असल्यामुळे गळती थांबविणे अत्यंत कठीण झाले होते. अखेरीस गॅसगळती थांबवण्यात अग्निशामक दलाला यश आले. या सर्व घटनेमुळे साताऱ्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.