Pune : पाण्यासाठी पुणेकरांचा अंत पाहू नका- अजित पवार

एमपीसी न्यूज- पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या धरणात पुरेसा साठा असताना पुणेकर नागरिकांना पाणीकपातीला सामोरे जावे लागत आहे. पाण्यासाठी पुणेकरांचा अंत पाहू नका. सत्ताधारी भाजपने पाण्याचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. पुण्यात एका कार्यक्रमासाठी अजित पवार आले असताना पत्रकाराशी संवाद साधताना त्यांनी भूमिका मांडली.

अजित पवार म्हणाले, ” माझ्या वेळेस देखील पुण्याचे महापौर, सभागृह नेते यांना विश्वासात घेऊन पाण्याचा निर्णय घेत होतो. माझ्या काळातही दुष्काळ होता. मात्र शहर आणि ग्रामीण भागाला कधीही पाणी कमी पडू दिले नाही. केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत भाजपची सत्ता असताना त्यांना पाण्याचे नियोजन करता येत नाही, ही दुर्देवाची बाब आहे. अजुन सहा महिने पाणी पुरवायचे आहे. पुण्याला जेवढं गरजेचं तेवढं पाणी द्यावे ” अशी मागणी त्यांनी केली.

महापौरांचे नाव प्रोटोकॉलनुसार असले पाहिजे

पुण्यात मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रमपत्रिकेत महापौर मुक्ता टिळक यांचे नाव नव्हते. त्यावरून महापालिकेच्या सभागृहात विरोधकांनी प्रशासनाला चांगले धारेवर धरले होते. तोच धागा पकडत अजित पवार पत्रकाराशी बोलताना म्हणाले की, शहरातील प्रशासनाच्या माध्यमातून घेण्यात येणार्‍या कार्यक्रमाच्या पत्रिकेत महापौरांचे नाव प्रोटोकॉलनुसार असले पाहिजे. मात्र पंतप्रधानांच्या कार्यक्रमात महापौरांचे नाव कार्यक्रम पत्रिकेत नव्हते. हे योग्य नसून आमच्या काळात प्रत्येक महापौरांचे नाव होते. हे लक्षात घेता सर्वांनी प्रोटोकॉल पाळावा. असा सल्ला देत भाजपवर निशाणा साधला.

पुण्याच्या लोकसभेच्या जागेबाबत निर्णय झाला नाही- अजित पवार

राज्यातील लोकसभेच्या 48 जागांपैकी 40 जागावर एकमत झाले असून 8 जागांवर चर्चा सुरू आहे. तर कालपासून पुण्याची जागा काँग्रेसला सोडल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. मात्र त्या बातम्यामध्ये काही तथ्य नसल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.