Pune : पुणे पदवीधर, शिक्षक निवडणूक प्रचाराची आज होणार सांगता

एमपीसी न्यूज – पुणे पदवीधर, शिक्षक निवडणूकीचा प्रचार आज (रविवारी, दि. 29) सायंकाळी पाच वाजता संपणार आहे. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणुक महाविकास आघाडी प्रथमच लढवत आहे. एकीकडे राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी तर दुस-या बाजूला केंद्रातील सत्ताधारी भाजप असल्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजप या दोघांसाठी देखील ही निवडणूक प्रतिष्ठेची समजली जात आहे.

पुणे पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी मतदान मंगळवारी (दि. 1 डिसेंबर) होणार आहे. तर गुरुवारी (दि. 3 डिसेंबर) मतमोजणी होणार आहे. पदवीधर मतदार संघाचे भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड, धर्मनिरपेक्ष जनता दलाचे माजी आमदार शरद पाटील, मनसेच्या रुपाली पाटील-ठोंबरे हे उमेदवार रिंगणात आहेत.

शिक्षक मतदार संघाचे विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत, भाजप पुरस्कृत जितेंद्र पवार, काँगेसचे उमेदवार जयंत आसगावकर, मनसेचे विद्यानंद मानकर, अपक्ष उमेदवार संतोष फाजगे हे उमेदवार पुणे शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी इच्छुक आहेत. या पाच प्रमुख उमेदवारांमध्ये पुणे शिक्षक मतदार संघाची लढत होणार आहे.

शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकांच्या नंतर काही महिन्यातच राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहे. त्यामुळे शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघात चार लाख 26 हजार 257 एवढे मतदार आहेत. तर पुणे शिक्षक मतदार संघात 72 हजार 545 मतदार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.