Pune : भारती विद्यापीठात कीर्तन पदविका अभ्यासक्रमसाठी प्रवेश सुरु

एमपीसी न्यूज – मनोरंजनातून समाजप्रबोधन करण्याचे प्रभावी माध्यम म्हणून नारदीय व वारकरी कीर्तन समजले जाते. कीर्तन प्रबोधनातून सुज्ञ व सुसंस्कृत पिढी घडावी या उद्देशाने भारती अभिमत विद्यापीठाच्या वतीने कीर्तन पदविका अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे, अशी माहिती स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌चे संचालक प्रा. शारंगधर साठे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

भारतात प्रथमच वारकरी व नारदीय अशा दोन कीर्तन पध्दतीचा एकत्रित पदविका कोर्स पुण्यात भारती विद्यापीठाने सुरु केला आहे. कीर्तन पध्दतीचा अभ्यास करण्याची इच्छा व कीर्तनाचे शास्त्रशुध्द शिक्षण घेण्याची इच्छा असणा-या विद्यार्थ्यांसाठी अल्पदरात चार वर्षांचा पदविका कोर्स भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या एरंडवणा येथील स्कूल ऑफ परफॉर्मिग आर्टस द्‌वारे कीर्तन पदविका अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे.

  • या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन सुरु असून http://spa.bharatividyapeeth.edu या संकेतस्थळावरुन ऑनलाइन अर्ज 30 जून 2019 पर्यंत भरायचे आहेत, अशी माहिती संचालक प्रा. शारंगधर साठे यांनी दिली. राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे, ज्येष्ठ कीर्तनकार हभप निंबराज महाराज जाधव आणि निमंत्रित कीर्तनकार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

या अभ्यासक्रमात अभंग, कीर्तन, आख्यान, संस्कृत आणि मराठी सुभाषिते, गीतेतील अभ्यास, विविध वृत्तांचा अभ्यास तसेच संगीतातील विविध घटकांचा अभ्यास करता येईल. विद्यापीठ मान्यताप्राप्त नारदीय व वारकरी कीर्तन अभ्यासक्रमास – 12 वी पास (आर्ट, कॉमर्स, सायन्स)चे विद्यार्थी, विद्यार्थींनी प्रवेश घेऊ शकतात. 12वी नंतर चार वर्षांच्या अभ्यासक्रमपूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना मान्यताप्राप्त पदविका प्रमाणपत्र विद्यापिठाकडून देण्यात येईल.

  • हा अभ्यासक्रम भारती विद्यापिठ अभिमत विश्वविद्यालय स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट, पुणे यांच्या वतीने गुरुकुल पद्धतीने शिकविला जाईल, अशीही माहिती पत्रकात देण्यात आली आहे. प्रवेश घेण्याची अंतिम दिनांक 30 जून 2019 अशी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.