Pune : 25 व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे उद्घाटन; बंधुतेचा विचार देतो माणूसपण जपण्याचा संस्कार – डॉ. मनोहर जाधव

एमपीसी – “सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत (Pune) काम करताना अनेकदा निराशा वाटेल, असे प्रसंग येतात. पण नेटाने आपले काम सुरु ठेवून रचनात्मक काम उभारले, तर यश निश्चित मिळते. बंधुतेची चळवळ गेली 40-50 वर्षे सुरु आहे. हा बंधुतेचा विचार समाजातील माणूसपण जपण्याचा संस्कार देतो. त्यामुळे तो विचार जनमानसात रुजायला हवा,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मनोहर जाधव यांनी केले.

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद, काषाय प्रकाशन पुणे, रयत शिक्षण संस्थेचे औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, भोसरी येथील भगवान महावीर शिक्षण संस्थेचे प्रीतम प्रकाश महाविद्यालय, भारतीय जैन संघटनेचे वाघोली येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रौप्य महोत्सवी (25 वे) राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे उद्घाटन डॉ. जाधव यांच्या हस्ते झाले.

नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या कार्यक्रमात संमेलनाध्यक्ष कवयित्री मधुश्री ओव्हाळ, बंधुताचार्य प्रकाश रोकडे, मावळते संमेलनाध्यक्ष प्रा. शंकर आथरे, स्वागताध्यक्ष प्रा. चंद्रकांत वानखेडे, मुख्य निमंत्रक प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, डॉ. अशोककुमार पगारिया, डॉ. संजय गायकवाड, डॉ. सविता पाटील आदी उपस्थित होते. यावेळी 25 कवींना बंधुता काव्यप्रतिभा पुरस्कार प्रदान करण्यात (Pune) आला.

दुपारच्या सत्रात कवी विलास ठोसर यांच्या अध्यक्षतेखाली ‘काव्यपंढरी’ कविसंमेलन झाले. रवींद्र यशवंतराव यांना प्रकाशगाथा साहित्य पुरस्कार, संदीप मुरबाड यांना प्रकाशयात्री साहित्य पुरस्कार, तर विनोद सावंत यांना प्रकाशपर्व साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. संदीप कांबळे, गुलाबराजा फुलमाळी, ज्ञानेश्वर शिंदे, डॉ. सुशील सातपुते, मीनाक्षी शिंदे, डॉ. भीम गायकवाड, चंद्रकांत धस, नरेंद्र पाटील, प्रकाश फर्डे, विजयकुमार पांचाळ, रोहिदास शिखरे, विजय अंधारे, सरिता कलढोणे, तुकाराम कांबळे, विना व्होरा, पौर्णिमा कुंभारकर, ज्ञानेश्वर काळे, दीपाली वाघमारे या निमंत्रित कवींनी कविता सादर केल्या.

Pimpri : देशाला हुकुमशाही पासून रोखण्यासाठी संविधानाची अंमलबजावणी होणे आवश्यक – रवींद्र धंगेकर

डॉ. मनोहर जाधव म्हणाले, “स्वातंत्र्य, समता व सामाजिक न्यायासाठी लढे उभा राहतात. मात्र, बंधुतेसाठी कोणी लढा देत नाही. बंधुता ही तुम्हा-आम्हाला एका धाग्यात बांधून ठेवणारा विचार आहे. मानवी मूल्यांची जपणूक करत बंधुतेचा हा धागा सर्वांपर्यंत पोहोचावा, यासाठी प्रकाश रोकडे यांनी जीवन समर्पित केले आहे. चांगले वाचन, आचरण असावे. आपल्या भवतालच्या समाजातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मिळालेल्या योगदानातून आपण समृद्ध होत जातो. त्या समाजाप्रती कृतज्ञतेची भावना ठेवली पाहिजे.”

अध्यक्षीय भाषणात मधुश्री ओव्हाळ म्हणाल्या, “बंधुतेच्या रौप्य महोत्सवी संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणे अभिमानास्पद आहे. जातीपातीचे कुंपण छेदून माणसाला माणूस म्हणून जोडण्याचे मूल्य बंधुता देते. स्वातंत्र्य, समता आणि सामाजिक न्याय प्रत्यक्षात यायचा असेल, तर त्याला बंधुतेची जोड आवश्यक आहे. आज स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही बंधुतेचा विचार सर्वांपर्यंत पोहोचलेला नाही. देशाच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उन्नतीसाठी बंधुतेचा विचार जनमानसात रुजायला हवा. त्यासाठी आपण सर्व बंधू-भगिनींनी एकदिलाने काम करण्याची गरज आहे.”

बंधुताचार्य प्रकाश रोकडे म्हणाले, “सध्याच्या गोंधळलेल्या, बावरलेल्या भयभीत व चिंताग्रस्त समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी साहित्यिक, विचारवंत, कवी-लेखकांनी सर्वस्पर्शी, समाजाला एकसंध ठेवणारी साहित्यनिर्मिती करावी. बंधुता लोकचळवळ आणखी प्रभावी होण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे.”

डॉ. अशोककुमार पगारिया, डॉ. अरुण आंधळे, प्रा. शंकर आथरे यांनीही मनोगते व्यक्त केली. प्रा. चंद्रकांत वानखेडे यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. संगीता झिंजुर्के यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. संजय गायकवाड यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.