Pune : नायलॉनच्या दोऱ्यात अडकलेल्या वटवाघळाची सुखरूप सुटका

सुटकेच्या प्रयत्नात वटवाघळाने घेतला अग्निशमन कर्मचाऱ्याच्या अंगठ्याला चावा

एमपीसी न्यूज- नॉयलॉनच्या दोऱ्यामध्ये अडकून पिंपळाच्या झाडावर बसलेल्या वटवाघळांच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. मात्र या प्रयत्नात कसबा पेठ अग्निशमन केंद्राचे कर्मचारी रघुनाथ चौधरी यांच्या उजव्या अंगठ्याला वटवाघळाने चावा घेतला.

रघुनाथ चौधरी यांनी या घटनेची माहिती दिली. सोमवारी (दि. 2 ) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कसबा पेठ अग्निशमन केंद्राच्या जवळ एका पिंपळाच्या झाडावर एक वटवाघूळ अडकल्याची माहिती स्थानिक नागरिकाने दिली. त्वरित अग्निशमन दलाचे कर्मचारी त्याठिकाणी गेले असता एक वटवाघूळ नायलॉनच्या दोऱ्यात अडकल्यामुळे पिंपळाच्या झाडावर उंचावर बसल्याचे दिसून आले.

शिडीच्या साहाय्याने त्याला खाली घेऊन कसबा अग्निशमन केंद्रामध्ये आणण्यात आले. या ठिकाणी त्याच्याभोवती असलेला दोरा बाजूला करायला सुरुवात केली. मात्र घाबरून गेल्यामुळे वटवाघळाने रघुनाथ चौधरी यांच्या उजव्या अंगठ्याला चावा घेतला. डाव्या हाताला नखाने ओरबाडल्यामुळे चौधरी जखमी झाले. अखेर वटवाघळाच्या डोक्यावर रुमाल टाकून मोठ्या शर्थीने त्याच्या भोवती असलेल्या दोऱ्याचा गुंता दूर करण्यात यश आले. दोरा दूर होताच वटवाघूळ उडून गेले.

मात्र वटवाघळाच्या चाव्याने जखमी झालेल्या चौधरी यांनी पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात उपचार घेतले. वटवाघूळ चावल्याची ही पहिलीच घटना असल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले. वटवाघूळ चावल्यामुळे कोणताही धोका नसला तरीही सुरक्षेचा उपाय म्हणून चौधरी यांना रेबीजचे इंजेकशन देण्यात आले आहे. चौधरी यांच्या प्रकृतीला कोणताही धोका नसल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.