Pune Kidnapping Case : … असा सापडला डुग्गू; पुण्यात अपहरणाचा नाट्यमय थरार

एमपीसी न्यूज – पुण्याच्या बालेवाडी परिसरातून अकरा जानेवारी रोजी चार वर्षांच्या चिमुरड्याचे अपहरण झाले. तब्बल आठ दिवसानंतर आज बुधवारी (दि. 19) पुनावळे येथे तो सुखरूप सापडला आहे. त्या मुलाला एका सोसायटीच्या वॉचमनकडे सोडून आरोपी पळून गेला आहे.

स्वर्णव उर्फ डुग्गू सतीश चव्हाण (वय 4) असे या मुलाचे नाव आहे. डुग्गूचे 11 जानेवारी रोजी बालेवाडी परिसरातून अज्ञातांनी अपहरण केले. याबाबत त्याच्या पालकांनी चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही तात्काळ हालचाली सुरू केल्या. अनेक पातळ्यांवर चौकशी करून देखील पोलिसांना यश आले नाही.

दरम्यान त्याचे वडील सतीश चव्हाण यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली. ‘माझा मुलगा डुग्गूबद्दल कुठलीही माहिती नाही. मला तो सापडला का, असे विचारायला कृपया फोन करू नका. तुमच्याकडे कुठलीही माहिती असेल तर प्लीज फोन करा. ज्या कोणी त्याला नेले मला माझा मुलगा परत द्या. फक्त एकदा फोन करा, तुम्ही मागाल ते आम्ही देऊ. प्लीज आम्हाला फोन करा’. अशी विनवणी सतीश चव्हाण यांनी पोस्टमध्ये केली होती.

आज दुपारी पुनावळे येथे एका सोसायटीच्या वॉचमनकडे दुचाकीवरून आलेल्या एका व्यक्तीने लहान मुलाला सोडले आणि जरावेळ लक्ष ठेवा मी आलोच, असे म्हणून तो व्यक्ती पळून गेला. बराच वेळ झाला तरी तो व्यक्ती येईना म्हणून वॉचमन दादाराव जाधव यांनी डुग्गूकडे असलेल्या बॅगची पाहणी केली. त्यात त्यांना एक चिट्ठी मिळाली. त्यात डुग्गूच्या पालकांचा मोबाईल क्रमांक होता. त्यावर वॉचमन जाधव यांनी व्हिडीओ कॉल केला.

चव्हाण कुटुंबीयांनी डुग्गूला पाहिले आणि ओळखले. कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती देत सोसायटीकडे धाव घेतली आणि आठ दिवसांपासून अपहरण झालेला डुग्गू पालकांच्या कुशीत विसावला.

डुग्गूचे आई आणि वडील दोघेही डॉक्टर आहेत. दोघांनी प्रथम डुग्गूच्या प्रकृतीची विचारपूस करत त्याची तपासणी केली. त्यात तो सुखरूप असल्याचे आढळून आले. पुणे पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला आणखी वेग दिला आहे. तपासाच्या अंतिम टप्प्यात असून लवकरच या प्रकरणाचा छडा लावणार असल्याचे पुणे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

https://www.youtube.com/watch?v=E3jTgxKBl8g

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.