Pune : कोंढवा भिंत दुर्घटना प्रकरण; ‘त्या’ बांधकाम व्यावसायिकांना 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

एमपीसी न्यूज – कोंढवा येथे झालेल्या भिंत दुर्घटनेत सुमारे पंधरा जणांचा मृत्यू झाला. यातील संशयित बांधकाम व्यावसायिकांना आज न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. विपुल अग्रवाल आणि विवेक अग्रवाल अशी पोलीस कोठडी सुनावलेल्या बांधकाम व्यावसायिकांची नावे आहेत.

कोंढवा येथील भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी बिल्डर अग्रवाल याच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेले सर्व अल्कॉन लँडमार्कस् रजिस्टर संस्थेचे भागीदार आणि कांचन रजिस्टर संस्थेचे भागीदार आहेत. तर विपुल आणि विवेक अग्रवाल यांना अटक केली आहे.

  • जगदीशप्रसाद तिलकचंद अग्रवाल (वय 64), सचिन अग्रवाल (वय 34), राजेश अग्रवाल (वय 27), विवेक सुनील अग्रवाल (वय 21) विपुल सुनील अग्रवाल (वय 21) पंकज व्होरा, सुरेश शहा रश्मिकांत गांधी यांच्यासह साईट इंजिनिअर, साईट सुपरवायझर, लेबर कॉन्ट्रॅक्टर व आणखी काही जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

कोंढव्यामधील सोमजी पेट्रोल पंपाजवळ इमारतीच्या पार्किंगची भिंत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला. तर, दोनजण जखमी झाले. मृतांमध्ये चार लहान मुलांचा समावेश आहे. मृतांचा आकडा 18  पर्यंत जाऊ शकतो अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. बांधकाम मजुरांसाठी तात्युरत्या स्वरूपात बांधलेल्या पत्र्याच्या खोल्यांवर ही भिंत कोसळली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.