Pune : कोयता गॅंगचा पुन्हा कहर; सहकारनगर हद्दीत 40 गाड्यांची तोडफोड

एमपीसी न्यूज – सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोयता (Pune)  गॅंगच्या गुंडांनी पुन्हा एकदा दहशत पसरवली. तळजाई परिसरातील वनशिव वस्तीमध्ये तोंड बांधून आलेल्या सहा जणांच्या टोळक्याने पार्क केलेल्या जवळपास 40 वाहनांची तोडफोड केली. पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला. अचानक घडलेल्या या घटनेने संपूर्ण वनशिव वस्ती परिसरात दहशत पसरली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सहा जणांचे हे टोळके एका व्यक्तीला शोधण्यासाठी तळजाई परिसरात आज पहाटेच्या सुमारास शिरले होते. ही व्यक्ती न सापडल्याने त्या टोळक्याने रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या दिसेल त्या गाड्यांची तोडफोड करण्यास सुरुवात केली.

Pune : येत्या तीन दिवसात पुण्यात मान्सून बरसण्याची शक्यता

हातातील कोयते, लोखंडी गज, लाठ्यांच्या सहाय्याने त्यांनी दुचाकी आणि रिक्षांची प्रचंड तोडफोड केली. तोडफोड करत असताना हे टोळके प्रचंड आरडाओरडा करत होते. त्यामुळे या परिसरातील नागरिक ही प्रचंड घाबरले होते.

या टोळक्याच्या हातात कोयत्यासारखे घातक शस्त्र असल्याने कुणीही बाहेर येऊन त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला नाही. या टोळक्याने परिसरातील घरावरही दगडफेक केली.

या घटनेत 10 ते 15 रिक्षा, 25 दुचाकी, काही कार यांचे नुकसान झाले आहे. सहकार नगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या टोळक्याची ओळख पटली असून त्यांचा शोध घेऊन अटक करण्याचे काम सुरु (Pune) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.