Pune : ‘लोकोपायलट’च्या सतर्कतेमुळे उरुळीजवळ २० नागरिकांचे प्राण वाचले; औरंगाबाद अपघाताची पुनरावृत्ती टळली

एमपीसीन्यूज : रेल्वे ट्रॅकवर चालणे जीव घेणे ठरू शकते या गोष्टीची पर्वा न करता अजून सुद्धा काही लोक रेल्वे ट्रॅकवर येऊन आपला जीव धोक्यात घालत आहेत. याचे ताजे उदाहरण उरुळी व लोणी स्टेशन दरम्यान पाहायला मिळाले. मात्र, मालगाडीच्या लोकोपायलटच्या प्रसंगावधानाने रेल्वे रुळांवरून चाललेल्या नागरिकांचे जीव वाचले. त्याचबरोबर औरंगाबादसारखी दुर्घटनाही टळली.

शुक्रवारी ( दि. ८) सायंकाळी सातच्या सुमारास हा प्रकार घडला. उरुळी व लोणी स्टेशन दरम्यान रेल्वे ट्रॅकवर काही लोक चालत होते. यामध्ये काही लोक आरामात ट्रॅकवर सामान घेऊन बसले होते, तर काही जण सामान घेऊन रेल्वे ट्रॅकवरुन चालत होते.

त्याचवेळी एक मालगाडी उरुळीवरून पुण्याला निघाली होती. रेल्वे ट्रॅकवरून काही नागरिक चालत जात असल्याचे मालगाडीच्या लोकोपायलटतच्या निर्शनास आले.

त्यामुळे प्रसंगावधान राखत लोकोपायलटने हॉर्न वाजवून मालगाडीचे इमर्जन्सी ब्रेक दाबला. त्यामुळे मालगाडी या लोकांपासून 100 मीटर दूर थांबवता आली. यामुळे तिथे असलेले जवळपास वीस लोक गाडीखाली येण्यापासून वाचले व मोठी दुर्घटना टळली.

या गोष्टीची सूचना तत्काळ नियंत्रण कार्यालयास कळविण्यात आली. त्यानंतर संबंधित लोकांना रेल्वे ट्रॅक पासून दूर हटविण्यात आले. तसेच रेल्वेमार्गाचा अशाप्रकारे चालण्यासाठी उपयोग करू नका, हेही त्यांना समजावण्यात आले.

रेल्वे ट्रॅकवर गाड्यांचे येणे जाणे चालू असते, त्यामुळे याठिकाणी चालणे फिरणे तुमच्या जीवावर बेतू शकते, याची जाणीवही त्यांना करून देण्यात आली.

दरम्यान, रेल्वे ट्रॅक किंवा त्याच्या आसपास असणे धोकादायक आहे. येण्या-जाण्यासाठी याचा उपयोग अजिबात करू नये. सध्या रेल्वे बंद आहे. परंतु लॉकडाऊनच्या काळामध्ये मालगाड्या ,पार्सल गाड्या मोठ्या प्रमाणात चालवल्या जात आहेत व काही श्रमिक स्पेशल गाड्या देखील चालवल्या जात आहेत. त्यामुळे कुणीही रेल्वे ट्रॅकवरून चालू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.