Pune : महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या ‘मिंग्लिश मिडीयम’ने सांगितले मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व

एमपीसी न्यूज : कलापिनितर्फे (Pune) दरवर्षी कै. कमलिनी व कै. पुरुषोत्तम परांजपे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बाल नाट्य महोत्सव साजरा केला जातो. अनेकविध कार्यक्रम या अंतर्गत आयोजित केले जातात. या वर्षी 43 व्या स्मृती पुष्पात दि. 23 एप्रिल रोजी दोन नाटके सादर केली गेली. पहिले नाटक होते महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे, ऋचा आपटे यांनी लिहिलेले “मिंग्लिश मिडीयम” हे नाटक. मुलांना इंग्रजी माध्यमात घालायचा पालकांचा अट्टाहास आणि त्याचा मराठी भाषेच्या ह्रासावर होणारा प्रभाव हा या नाटकाचा मूळ गाभा आहे.

मराठी माध्यमातून अचानक इंग्लिश माध्यमात प्रवेश घेतल्यामुळे एका विद्यार्थ्याची होणारी कुचंबणा, त्यातून त्यानेच शोधून काढलेला मार्ग, आणि शेवटी मराठी मातृभाषा असणाऱ्या मुलांसाठी इंग्लिश मिडीयम ऐवजी मिंग्लीश मिडीयम चा उपाय, लेखिकेने अगदी रंजक पद्धतीने मांडला आहे. मोठ्यांनी छोट्यांसाठी केलेल्या ह्या नाटकाचे दिग्दर्शन क्षितिज दाते यांनी केले आहे.

दुसरे नाटक ‘नारद झाला गारद’ हे कलापिनीच्या कुमार भवनच्या मुलांनी सादर केले. श्रीकृष्णाचा खरा भक्त कोण? याचा शोध घेत ब्रम्हांड फिरणाऱ्या नारदाला जेव्हा कळतं की मथुरेच्या गवळणी आणि राधा श्रीकृष्णावर मनोभावे प्रेम करतात आणि त्यांच्या चरण धुळीने श्रीकृष्णाचा मस्तक शूळ थांबू शकतो, तेव्हा नारदाला आश्चर्याचा धक्का बसतो आणि त्याचे गर्व हरण होते, अशी गोष्ट या नाटकातून सांगितली आहे. हे नाटक (Pune) लिहिले आहे यांनी आणि त्याचे दिग्दर्शन केले आहे संदीप मनवरे व विद्या अडसुळे यांनी.

Arogyavardhini : आरोग्यवर्धिनी भाग एक – थेरगाव रुग्णालय सर्वसामान्यांसाठी ठरतंय आधारवड!

समस्त कालापिनी परिवार, सर्व उन्हाळी शिबिरार्थी आणि त्यांचे पालक यांनी या दोन्ही नाटकांचा आनंद लुटला.

संस्थेच्या कार्याध्यक्षा अंजली सहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविक केले व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कै. कमलिनी व कै. पुरुषोत्तम परांजपे यांना असलेला लहान मुलांचा ओढा आणि मुलांनी नाटक सादर करण्याची कळकळ याचा आवर्जून उल्लेख अंजली ताईंनी केला. त्यांच्या कन्या उषा पुरंदरे यांचा कलापिनीला असलेला हातभार ही महत्त्वाचा आहे, असे त्या म्हणाल्या.

डॉ. परांजपे यांनी प्रमुख पाहुणे तळेगावचेच बुजुर्ग नाट्यकर्मी अभय काका लिमये यांची ओळख करून दिली. आपल्या संयुक्तिक भाषणात लिमये काकांनी नाटक या शब्दाची व्याख्या अगदी सोपी करून सांगितली. ते म्हणाले, ‘मनात अटक न करता सर्व भाव भावना साकारणं म्हणजे नाटक’. ऋचा आपटे यांनी त्यांच्या मनोगतात तळेगावच्या रसिक प्रेक्षकांसमोर नाटक सादर करण्याची संधी मिळाली याचा आनंद व्यक्त केला.

कार्यक्रमासाठी रंगमंच व्यवस्था, ध्वनी संयोजन आणि प्रकाश योजना अभिलाष, प्रतीक, स्वच्छंद आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. शेवटी संस्थेचे उपाध्यक्ष बकरे काका यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन ऋचा पोंक्षे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.