Arogyavardhini : आरोग्यवर्धिनी भाग एक – थेरगाव रुग्णालय सर्वसामान्यांसाठी ठरतंय आधारवड!

सर्वसामान्यांना परवडणा-या दरात थेरगाव रुग्णालयात शेकडो रुग्ण घेताहेत उपचार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने थेरगाव रुग्णालयाचा (Arogyavardhini) कायापालट केला आहे. नव्या रूपात रुग्णालय सुरु झाले असून रुग्णालयात माफक दरात उपचार केले जात आहेत. त्याचबरोबर थेरगाव रुग्णालयात स्त्रीरोग आणि अन्य विविध आजारांच्या शस्त्रक्रिया सर्वसामान्य रुग्णांना परवडेल अशा दरांमध्ये केल्या जात आहेत. महापालिकेने शहरात प्रत्येक भागात रुग्णालये सुरु केली असून ही रुग्णालये गरजूंसाठी वरदान ठरत आहेत. शहरातील अशा सर्व रुग्णालयांचा आढावा एमपीसी न्यूजने आरोग्यवर्धीनी या मालिकेत घेतला आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील रुग्णांसह संपूर्ण राज्यभरातून रुग्ण थेरगाव रुग्णालयात उपचारासाठी येत आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेने जून 2021 मध्ये थेरगाव रुग्णालयाची स्थापना केली. प्रारंभी रुग्णांचे प्रमाण कमी होते. मात्र, आता दररोज सुमारे एक हजार रुग्ण विविध आजारांच्या उपचारासाठी येथे येतात. त्याचे कारण म्हणजे येथे दिली जाणारी माफक आणि मोफत रुग्णसेवा.

माफक दरात सुविधा –

थेरगाव रुग्णालयात 200 बेड असून अतिदक्षता विभागातील खाटांची संख्या 22 आहे. चार शस्त्रक्रिया विभाग आहेत. तसेच खिशाला न परवडणारी एमआरआय प्रक्रिया येथे माफक दरात उपलब्ध आहे. या सोबतच सिटीस्कॅनची सुविधाही लवकर सुरु करण्यात येणार आहे.

पुढील सुविधा उपलब्ध –

या रुग्णालयात स्त्रीरोगाशी संबंधित सर्व शस्त्रक्रिया केल्या जातात. येथे प्रसुती गृह, बालरोग विभाग, मानसोपचार विभाग, शस्त्रक्रिया विभाग, अपघात विभाग, अस्थिरोग विभाग, कान-नाक-घसा विभाग, नेत्र विभाग, सर्दी-ताप-खोकला, दंत विभाग, फिजिओथेरपी, (Arogyavardhini) पॅथॉलॉजी, एक्स-रे, सोनोग्राफी अशा विविध सुविधा पुरविल्या जातात. त्यामुळे या रुग्णालयामध्ये मोठया प्रमाणात रुग्णांची गर्दी होते.


पिपंरी चिंचवड शहरातील वायसीएम रुग्णालय, थेरगाव रुग्णालय, आकुर्डी रुग्णालय, जिजामाता रुग्णालय, भोसरी रुग्णालय इ. मोठमोठी रुग्णालये आहेत. या सर्व रुग्णालयांमध्ये उच्च दराचे उपचार दिले जातात. तसेच, रुग्णालयातील सर्व रुग्णांना सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. त्यामध्ये महापालिकेच्या रुग्णालयात सोनोग्राफी, आयसीयू अशा विविध सुविधा दिल्या जातात. तसेच, खासगी रुग्णालयापेक्षा महापालिकेच्या रुग्णालयात अल्प दरात उपचार केले जातात.

– वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण गोखले (पिपंरी चिंचवड महापालिका)


 

Chinchwad : आऊट डोअर कंट्रोल पॅनेलची चोरी

कान – नाक – घशासाठी पुढील उपचार –

कान-नाक-घसा विभाग पूर्ण क्षमतेने सुरु असून कानाच्या शस्त्रक्रियांमध्ये मध्यकर्णपटलाची सुघटन शस्त्रक्रिया (टायम्पॅनोप्लास्टी), कानामध्ये पू होणे (मॉडिफाईड रॅडिकल मास्टोइडेक्टॉमी), ऐकण्याची क्षमता सुधारणे (स्टेपॅडोटोमी), कानाच्या मधल्या भागात जमलेला द्रव काढणे (मायरिंगोटॉमी विथ ग्रोमेट) आणि अन्य शस्त्रक्रिया केल्या जातात.

नाकाच्या शस्त्रक्रियांमध्ये नाक सरळ करणे (सेप्टोप्लास्टी), नाकाची प्लास्टिक सर्जरी (राइनोप्लास्टी), सायनसशी संबंधित शस्त्रक्रिया (फंक्शनल सायनस सर्जरी) आणि अन्य शस्त्रक्रिया केल्या जातात.

घशातील गलग्रंथी (टॉन्सिल) काढून टाकणे, नाकातून घशाकडे येणाऱ्या ग्रंथी (एडिनॉइड), पेरीटॉन्सिलर ऍबसेस, कंठग्रंथीची शस्त्रक्रिया (थायरोग्लॉसल सिस्ट एक्सिशन), थायरॉईड आणि अन्य शस्त्रक्रिया केल्या जातात.

स्त्री रोगांवरही होतात उपचार – 

याशिवाय हर्निया, कर्करोग, मूळव्याध, मधुमेह, आतड्याच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. स्त्रीरोग संबंधित शस्त्रक्रियांमध्ये सिझेरियन सेक्शन, गर्भाशयाची पिशवी काढणे, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, तीन महिन्यांपर्यंत गर्भपात या सर्व शस्त्रक्रिया माफक दरात केल्या जातात.

महापालिकेच्या रुग्णालयात आत्यधुनिक सोयी – सुविधा आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील नागरिकांचा महापालिकेच्या रुग्णालयात जाण्याचा कल वाढला आहे. तसेच, रुग्णालयात होणाऱ्या उपचारांसाठी सर्वसामान्यांना परवडणारे दर असल्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व स्तरातील लोक उपचार घेत आहेत. माफक दरांनी होणारे उपचार यासाठी थेरगाव रुग्णालयाला लोकांची पसंती मिळत आहे.

 – हेमांगी सुर्यवंशी

(पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे लहान रूपातून नव्या स्वरूपात परिवर्तन केलेल्या सुसज्ज रुग्णालयांच्या सेवा सुविधांची माहिती ‘आरोग्यवर्धिनी’ या सदरमध्ये दर आठवड्याला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पुढील सदरात आपण ‘आकुर्डी’ रुग्णालयाची माहिती पाहणार आहोत.) 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.