Pune : नव्या लॉकडाऊनला महापौरांचा विरोध ; पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त

एमपीसी न्यूज – पुणे शहरात नव्याने लागू केलेल्या लॉकडाऊनला महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विरोध केला असून, त्यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे.

आज ) सोमवारी ) सकाळपासून पुण्यातील सर्वच रस्त्यांवर असणारी गर्दी चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवा, त्याही सकाळी १० ते दुपरी २ या वेळेत संपूर्ण शहरात असाव्यात. नव्या आदेशानुसार १० ते ७ वेळ असल्याने लोक दिवसभरही बाहेर असू शकतील. यावर नियंत्रण कसे आणणार? असा सवालही महापौरांनी उपस्थित केला आहे.

पुणेकरांनी पहिले दोन लॉकडाऊन व्यवस्थित पाळले असताना आणि रुग्णसंख्या आटोक्यात येण्याची शक्यता असताना नवे आदेश शहराला परवडणारे नाहीत. सव्वा महिन्यात पुण्यातील परिस्थिती आटोक्यात आहे. त्यासाठी पोलीस, प्रशासन, आरोग्य अधिकारी यांनी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे लॉकडाऊन पूर्वी प्रमाणेच सुरू ठेवा. आज हजारो नागरिक रस्त्यावर आल्याने आपला उद्देश सफल ठरताना दिसत नाही, असेही महापौर म्हणाले.

यासंदर्भात पोलिसांनाही विनंती करणार असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, आज उडालेल्या गोंधळावरही महापौरांनी नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारचे निर्णय 8 दिवसांपूर्वी का घेतले नाही, असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला.

आज दारूची दुकाने सुरू होणार असल्याने नागरिकांनी सकाळी 7 पासूनच गर्दी केली होती. तोंडाला मास्क, रुमाल बांधून लोक ऊभे होते. शहरात काही ठिकाणी सोशल डिस्टन्सचे नियम पाळण्यात येत होते. तर, कुठे नियम पायदळी तुडवीत असल्याचे चित्र दिसून आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.