Pune : मिलिंद तुळाणकर यांच्या जलतरंग वादनाने 9 व्या गानसरस्वती महोत्सवाला सुरुवात

एमपीसी न्यूज : गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या (Pune) भारतीय शास्त्रीय संगीतातील अलौकिक योगदानाला मानवंदना देण्यासाठी नाट्यसंपदा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या गानसरस्वती महोत्सवाला आज मिलिंद तुळाणकर यांच्या सुमधुर जलतरंग वादनाने सुरुवात झाली. महोत्सवाचे हे 9 वे वर्ष असून राजाराम पुलाजवळील डी पी रस्ता येथील केशवबाग या ठिकाणी महोत्सव संपन्न होत आहे. मिलिंद तुळाणकर यानंतर डॉ अलका देव मारुलकर यांच्या कसदार गायकीने रसिकांनी स्वरमय अशा सायंकाळचा सुखद अनुभव घेतला.

वेदमूर्ती स्वरूप दीक्षित आणि ऋषिकेश कोल्हटकर यांनी केलेल्या मंत्रपठनाने महोत्सवाला औपचारिक सुरुवात झाली. किशोरी आमोणकर यांचे सुपुत्र निहार आणि बिभास आमोणकर, महोत्सवाचे आयोजक पं रघुनंदन पणशीकर, अपर्णा पणशीकर, जाई काजळचे राजेश गाडगीळ, फ्लीटगार्ड फिल्ट्रमचे निरंजन किर्लोस्कर आणि बेलवलकर हाउसिंगचे अजित बेलवलकर आदी यावेळी उपस्थित होते.

जलतरंग हे एक अतिप्राचीन वाद्य असून वेदांमध्ये याचा उल्लेख आढळतो असे सांगत मिलिंद तुळाणकर यांनी राग मधुवंतीने आपल्या वादनाला सुरुवात केली. राग मधुवंतीमध्ये आलाप, जोड, झाला यांचे दमदार सादरीकरण त्यांनी केले. यांनतर त्यांनी दोन बंदिशी प्रस्तुत केल्या.

महोत्सवाला सुरूवात करताना आनंद होतोय असे सांगत ते पुढे म्हणाले (Pune) की, 10 व्या शतकात पोर्सेलिनचा शोध लागेपर्यंत धातूच्या भांड्यावर लाकडी काठीने कलाकार जलतरंग सादर करीत असत. त्यानंतर वापरायला नाजूक अशी पोर्सिलिनची भांडी वापरली जाऊ लागली. आज मी मागील 33 वर्षे माझ्या आजोबांचा म्हणजे पं. शंकरराव कान्हेरे यांचा 85 वर्षे जुना जलतरंग वाजवतो आहे.” हा जलतरंग जपण्यासाठी खास प्रयत्न करावे लागत असून मी अनेक प्रकारच्या स्टीक्स आणि प्रत्येक बाऊलसाठी वेगळी बैठक व्यवस्था करीत हा जपत आहे, असेही तुळाणकर म्हणाले.

राग हंसध्वनीमध्ये मध्यलय तीनतालातील ‘वातापी गणपती ‘ ही बंदिश आणि सवाल जवाब सादर करीत मिलिंद तुळाणकर यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप केला. त्यांना पं रामदास पळसुले (तबला) व गणेश पापळ (पखावज) यांनी साथसंगत केली.

Pune : मक्याच्या नावाखाली शेतकरी पिकवत आहेत अफू; पोलिसांनी टाकला छापा

यानंतर विदुषी डॉ अलका देव मारुलकर यांचे गायन झाले. त्यांनी श्री रागाने आपल्या गायनाला सुरुवात केली. यामध्ये पारंपरिक विलंबित तीनताल मध्ये त्यांनी ‘साँझ भयीं…’ ही बंदिश सादर केली. यांनतर त्यांनी द्रुत अध्दा मध्ये ‘ सुंदर सुभग बदन श्याम…’ ही स्वरचित रचना प्रस्तुत केली. यानंतर त्यांनी राग सावनी नट मधील स्वरचित मध्य द्रुत रूपकमधील ‘ झुलत सीर…’ ही रचना सादर केली. त्याला जोड म्हणून दृत एकतालात त्यांनी स्वतः तयार केलेल्या राग आनंद कल्याणचे सादरीकरण केले. यामध्ये त्यांनी ‘फुलन लाई, कलियन लाई, मालनिया लाई ही बंदिश’ प्रस्तुत केली. यानेच त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला. त्यांना संजय देशपांडे (तबला) व सुयोग कुंडलकर (संवादिनी), शिवानी व कल्याणी (स्वर व तानपुरा) यांनी साथसंगत केली.

विघ्नेश जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. तर कार्यक्रमाच्या सुरुवातील श्री राघवेंद्र स्वामी यांनी दिलेल्या शाल व श्रीफळाने पं रघुनंदन पणशीकर आणि अपर्णा पणशीकर यांचा सन्मान करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.