Pune : भाजप आमदारावर गुन्हा दाखल करण्याऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या समर्थनार्थ मनसेचा पुण्यात मोर्चा

एमपीसी न्यूज- भाजपा आमदार योगेश टिळेकर यांच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात खंडणी मगितल्याप्रकरणी मागील आठवड्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर मिलिंद गायकवाड यांची पुणे पोलिसांच्या विशेष शाखेत बदली करण्यात आली. पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांच्या समर्थनार्थ आज, शुक्रवार सकाळी मनसेच्या वतीने कोंढवा पोलीस ठाण्यावर मूक मोर्चा काढण्यात आला. या मूक मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

“भाजपचे आमदार योगेश टिळेकर आणि त्यांच्या भावावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना अटक करण्याऐवजी कर्तव्यदक्ष अधिकारी असलेल्या मिलिंद गायकवाड यांची बदली करण्यात आली आहे. हा भारतीय जनता पक्षाचा कुठला पारदर्शी कारभार आहे. आमदार योगेश टिळेकर यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला आहे तो पूर्ण चौकशीअंती झाला आहे. त्याचे सर्व पुरावे पोलिसांकडे आहेत. असे असताना एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदली करण्यात आली. ही निषेधार्थ बाब असून शासनाचा सरकारी यंत्रणेवर विश्वास नाही काय ?”असा सवाल मोर्चाचे नेतृत्व करणारे मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.